बेळगाव : वर्षातून एकच परंतु अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी पर्यावरण पूरक श्री गणेश मूर्ती बनवणारे मूर्तिकार म्हणून सुपरिचित असलेले जुने गांधीनगर येथील कल्पक मूर्तिकार सुनील सिद्धाप्पा आनंदाचे यांनी यंदा तब्बल 2 लाख 21 हजार 111 चिंचेचे बिनचोकरे वापरून भव्य अशी पर्यावरण पूरक श्री एकदंताची मूर्ती साकारली आहे.
जुने गांधीनगर येथील मूर्तिकार सुनील सिद्धाप्पा आनंदाचे गवत, वृत्तपत्राची रद्दी, कागदी रट्ट यापासून पर्यावरण पूरक श्री गणेशाच्या मूर्ती बनवतात. आनंदाचे यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते वर्षातून एकच सार्वजनिक श्री गणेश मूर्ती तयार करतात यंदा त्यांनी माळी गल्ली सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाची मूर्ती बनवली आहे. ही मूर्ती संपूर्णपणे पर्यावरण पूरक असून ती चिंचोकरे अर्थात चिंचेच्या बियांपासून मोठ्या कल्पकतेने बनवण्यात आली आहे.
आपल्या मूर्तीकलेसंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना सुनील आनंदाचे म्हणाले की, मी दरवर्षी फक्त एकच सार्वजनिक श्री गणेश मूर्ती बनवण्याची ऑर्डर घेतो. माझी प्रत्येक मूर्ती ही पर्यावरण पूरक असते आणि ती बनवण्यासाठी मी गवत, वृत्तपत्राची रद्दी, कागदी रट्ट यांचा वापर करतो. दरवर्षी काहीतरी वेगळं देण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यानुसार यंदा चिंचेच्या बिया अर्थात चिंचोके वापरून मी श्री एकदंताची मूर्ती साकारली आहे. चिंचोकऱ्यांपासून श्री गणेशाची भव्य मूर्ती बनवण्यामागचा माझा मुख्य उद्देश ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश देणे हा आहे.
सदर मूर्तीसाठी तब्बल 2 लाख 21 हजार 111 बिंचोके वापरण्यात आले आहेत. दरवर्षी मी प्रथम येणाऱ्या एकाच मंडळासाठी श्रीमूर्ती तयार करतो. यावर्षी माझ्याकडे हुबळीच्या एका आणि बेळगावच्या तीन अशा एकुण 4 सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांनी मूर्ती तयार करून देण्याची विनंती केली होती. मात्र वैयक्तिक इतर कामांच्या व्यापामुळे मी फक्त माळी गल्ली सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाची ऑर्डर स्वीकारली.
दरवर्षी पर्यावरण पूरक श्री गणेश मूर्तीच्या माध्यमातून कांहीतरी आगळ्यावेगळ्या देण्याचा माझा प्रयत्न असतो अशी माहिती देऊन मूर्ती बनवण्याच्या कार्यात मला माझ्या एका सहकार्यासह आजूबाजूच्या लहान मुलामुलींचे देखील सहकार्य लाभते. खरंतर लहान मुलेच मला अधिक सहकार्य करत असतात, असे मूर्तिकार आनंदाचे यांनी स्पष्ट केले.