Ajit Pawar : आपल्या आपल्या परिने प्रत्येकजण अंदाज व्यक्त करत होते. मात्र महाराष्ट्रातल्या जनतेने विकासाकडे पाहून जे यश प्राप्त करुन दिलं आहे. त्यामुळे मी मनापासून सगळ्या महाराष्ट्राचे आभार मानतो. कार्यकर्ते राबले, उमेदवार राबले आणि सगळ्यांनी ही निवडणूक आपली निवडणूक आहे असं समजून कामाला लागले. आमच्या योजनांबाबत चेष्टा मस्करी करण्यात आली. राज्य कंगाल केलं वगैरे सांगण्यात आलं. मात्र विरोधकांचे जाहीरनामे आल्यानंतर काय चाललं आहे ते आम्हाला समजलं. आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत अपयश आलं. त्यातून आम्ही सावरण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्प सादर करताना योजना आणल्या. लाडकी बहीण योजना गेमचेंजरच ठरली. त्यामुळे सगळे विरोधक उताणे पडले. आता आमच्यावरची जबाबदारी वाढली आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
मी राजकारणात आलो तेव्हापासून प्रचंड बहुमत पाहिलेलं नाही-अजित पवार
मी जेव्हापासून राजकारणात आलो आहे, तेव्हापासून इतकं प्रचंड बहुमत मी पाहिलेलं नाही. 222आणि 225 असं महाराष्ट्रात मिळालेलं यश मी पाहिलेलं नाही असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अलिकडच्या काळात जसं आम्हाला समजतंय ते यश पहिल्यांदाच मिळालं आहे. खूप काही काम करावं लागेल असं मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना फोन करुन सांगितलं. आम्हाला त्यात कुठलीही अडचण नाही. आमच्या पाठिशी केंद्र सरकार आहे. त्यांचा आम्हाला खूप मोठा आधार आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
आता पुढची पाच वर्षे आम्ही एकोप्याने काम करु-अजित पवार
विरोधक टीका करतात की बॅलेट पेपरने निवडणूक घ्यायला हवी होती. मग ती लोकसभेलाही घ्यायला हवी होती. तेव्हा ईव्हीएम बरोबर होतं का? झारखंड आमच्या हातून गेलं आहे आम्ही काही म्हटलं आहे का? महायुतीचा महाराष्ट्रात जोर सगळ्याच ठिकाणी पाहण्यास मिळाला असंही अजित पवार म्हणाले. सगळीकडे महाराष्ट्रात महायुतीला चांगलं यश मिळालं. जनतेच्या ऋणातच आम्ही राहू शकतो. पाच वर्षे अत्यंत एकोप्याने शेवटपर्यंत काम करेल आणि राज्याच्या सर्वांगिण विकासासाठीच काम करु. विकास हा केंद्रबिंदू मानून आम्ही काम करत आहोत, करत राहू मतदार बंधू भगिनींचे मी आभार मानतो असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसंच आमच्यावरची जबाबदारी आता वाढली आहे असंही अजित पवार म्हणाले.