बेळगाव : हिरेबागेवाडी टोलनाक्याजवळ शेतकऱ्यांचा विरोध डावलून पुन्हा बायपासचे कामकाज सुरु करण्यात आले आहे. सोमवार आणि मंगळवारी हे कामकाज सुरु करण्यासाठी कंत्राटदारांनी यंत्रसामुग्री जमा केली होती.
मात्र शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन हे कामकाज बंद पाडले होते. कामकाजादरम्यान येथील शेतकऱ्यांनी रुद्रावतार दाखवत मशिनी बाहेर घालवून पुन्हा एकदा विरोध व्यक्त केला मात्र आज पुन्हा पोलीस बंदोबस्तात बायपासचा कामकाजाला सुरुवात करण्यात आली आहे.
अलारवाड क्रॉसजवळ हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम करण्यासाठी तयारी सुरु करण्यात आली होती. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी कंत्राटदारांसह अधिकाऱ्यांना पिटाळून लावले होते.
सध्या शेतात पिके आहेत. या पिकांवर यंत्र फिरवण्यात आल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. यासाठी झिरो पॉईंट फिक्स झाल्याशिवाय, शेतकऱ्यांशी चर्चा केल्या शिवाय कोणतेही काम करू नये. बायपास वर येऊनच शेतकऱ्यांशी चर्चा करावी,
शासकीय कागदपत्रे दाखवूनच कामाला सुरुवात करावी असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता.
मात्र शेतकऱ्यांचा हा विरोध डावलून आजही बायपास रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. एकीकडे शेतकऱ्यांनी बायपासप्रकरणी घेतलेली आग्रही भूमिका, उग्र आंदोलनाचा दिलेला इशारा आणि दुसरीकडे पुन्हा शेतकऱ्यांच्या या विरोधाला न जुमानता सुरु करण्यात आलेले कामकाज यामुळे नजीकच्या काळात शेतकरी आंदोलन पुन्हा पेटणार असेच चित्र दिसत आहे.