बेळगाव : संपर्क प्रणाली (कनेक्टिव्हिटी) सुधारण्यासाठी आणि लाखो भाविकांसाठी तीर्थयात्रा सुलभ करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलताना बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी सौदत्तीपर्यंत नवीन रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी सर्वेक्षण करण्याची विनंती केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे.
खासदार शेट्टर यांनी सदरचा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमोर नवी दिल्ली येथे मांडला. यावेळी उपस्थित असलेले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सोमन्ना मन्या यांनीही खासदार शेट्टर यांच्या विनंतीला पाठिंबा दर्शविला. सौदत्ती येथील सुप्रसिद्ध श्री रेणुका (यल्लम्मा) देवी मंदिर देशभरातील भक्तांना आकर्षित करते. परंतु सध्या या देवस्थानाच्या ठिकाणी जाण्याकरिता रस्ते मार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही. परिणामी वाहतूकच्या समस्येमुळे भाविकांची गैरसोय होऊन त्यांना त्रास सहन करावा लागतो.
या समस्येकडे लक्ष वेधताना खासदार शेट्टर यांनी भाविकांसाठी सदर तीर्थक्षेत्राला भेट देणे सुलभ, सुरळीत व्हावे यासाठी सौंदत्तीपर्यंत रेल्वे संपर्क वाढवण्याची नितांत गरज रेल्वे मंत्र्यांसमोर व्यक्त केली. सौदत्तीला रेल्वे संपर्क प्रदान करणे हे भाविकांच्या मोठ्या गर्दीला सामावून घेण्यासाठी आणि मंदिर रस्त्यावरील वाहतुकीच्या समस्या दूर करण्यासाठी आवश्यक आहे, असे खासदार शेट्टर यांनी नमूद केले. तसेच केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना हुबळी नैऋत्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना प्रस्तावित रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्याची विनंती केली.
सदर विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय रेल्वे मंत्री वैष्णव यांनी मांडलेल्या प्रस्तावाचा विचार करण्याचे आश्वासन देत नवीन रेल्वे मार्गाच्या दिशेने संभाव्य प्रगतीचे संकेत दिले.
या प्रस्तावासोबतच खासदार जगदीश शेट्टर यांनी 2016 मध्ये हुबळी रेल्वे स्थानकावर म्हादई प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी विरोध करणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांनी रेल्वे गाड्या थांबवल्याचा मुद्दाही उपस्थित केला. तसेच ही प्रकरणे रद्द करावीत अशी विनंतीही त्यांनी रेल्वे मंत्र्यांना केली. ज्यावर मंत्र्यांनी सखोल आढावा घेण्याचे आश्वासन दिले.