सिंधुदुर्ग : मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा 28 फूट पुतळा कोसळला. या घटनेचे दुःख निश्चितच मनामध्ये आहे. ही दुर्घटना असली तरी यातून काहीतरी चांगलं घडावं, ही भावना माझ्या मनात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पुन्हा शिवाजी महाराज यांचा 100 फूट उंचीचा पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मालवण येथे आज दि. 27 पत्रकार परिषदेत सांगितले. दीपक केसरकर यांनी राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची पाहणी केली. यावेळी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राजा गावकर, बबन शिंदे, किसन मांजरेकर, ऋत्विक सामंत, सोनाली पाटकर आदी उपस्थित होते.
केसरकर पुढे म्हणाले की, राज्य सरकारकडून अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम सुरू होते. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे थांबले आहे. महाराष्ट्रातील उंच पुतळा मालवणात उभारला जावा, ही शिवप्रेमींची इच्छा आहे. नेव्ही ही आपल्या देशाचे संरक्षण करते. त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन पुन्हा शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभे झाले, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल आणि हीच महाराजांना आदरांजली ठरेल.