Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजप आणि शिंदे गटाकडून पहिली यादी जाहीर करण्यात आल्यानंतर आज (23 ऑक्टोबर) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर केली. अजित पवार यांच्याकडून पहिल्या यादीमध्ये 38 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र यामध्ये वादात असलेल्या मतदारसंघांमध्ये उमेदवार अजूनही दिलेले नाहीत. पोर्शे कार अपघातानंतर अडचणीत आलेल्या सुनील टिंगरे यांची उमेदवारी सुद्धा पहिल्या यादीमध्ये जाहीर करण्यात आलेली नाही. नवाब मलिक यांचंही पहिल्या उमेदवारी यादीत नाव आलेलं नाही.
दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात उमेदवार देणार आहेत. इस्लामपूर वाळवा मतदारसंघातून पहिल्या यादीमध्ये अजित पवार यांच्याकडून जयंतरावांच्या विरोधात उमेदवार जाहीर केला जाईल, अशी चर्चा रंगली होती. मात्र, पहिल्या यादीमध्ये जयंत पाटील यांच्या विरोधात मोहरा अजूनही अजित पवारांनी निश्चित केलेला नाही. या मतदारसंघांमध्ये भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून त्यांना रिंगणात उतरवले जाईल अशी चर्चा आहे. या निर्णयानंतर शिंदे गटात अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. गौरव नायकवडी आणि आनंदराव सुद्धा शिंदे गटाकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत.
मतदारसंघावरून वाद?
अजित पवार यांनी सांगली मधून तासगाव तसेच कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून सुद्धा उमेदवार देण्याची रणनीती आखली आहे. यामुळे जयंत पाटील यांच्यासह रोहित पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे चेहरा कोणता असणार याची चर्चा आहे. पहिल्या यादीत दोन्ही मतदारसंघांमध्ये अजित पवार यांनी उमेदवार जाहीर केलेला नाही. दरम्यान, निशिकांत पाटील यांनी प्रयत्न सुरु केल्यानंतर शिंदे गटाने सुद्धा प्रयत्न सुरु केले आहेत. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत निशिकांत पाटील यांनी दुसऱ्या क्रमाकांची मते घेतली होती. गौरव नायकवडी तिसऱ्या क्रमांकावर होते. यामुळे शिंदेंकडून या मतदारसंघासाठी आग्रह सुरु असल्याची चर्चा आहे. निशिकांत पाटील यांचा प्रवेश अजित पवार गटातील प्रवेश त्यामुळेच लांबत चालला आहे.