बेळगाव : महिला सुरक्षेसाठी विशेष उपाययोजनांची अंमलबजावणी करावी आणि बालविवाह तसेच पोक्सो कायद्याविषयी जनजागृती करावी, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले. महिला व बालविकास विभागाच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय समन्वय बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.
महिला व मुलांवरील गुन्हे गांभीर्याने हाताळून दोषींवर कारवाई केली जावी, महिला सुरक्षेसाठी विशेष लक्ष द्यावे, बालविवाह आणि पोक्सो कायद्याबाबत अधिक जनजागृती करावी. महिला अत्याचारांच्या घटनांना तातडीने प्रतिसाद देत अंमलात आणणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, सखी वन स्टॉप सेंटरच्या सहाय्यवाणी क्रमांकाची सातत्यपूर्ण उपलब्धता आवश्यक आहे. या केंद्राच्या माध्यमातून तातडीने प्रतिसाद मिळावा. पोलिस विभागाचा सहकार्य महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पोलिस विभागाकडून मिळणाऱ्या शिफारशी पत्राच्या आधारावर निराश्रित महिलांना निवास व्यवस्था दिली जाईल. या संदर्भात पोलिस सहाय्य आवश्यक आहे, आणि संकटाच्या परिस्थितीत 112 वर कॉल करून त्वरित मदत घेण्याचेही निर्देश देण्यात आले.
चिक्कोडी, निपाणी तसेच कागवाड तालुक्यांमध्ये ग्रामपंचायत स्तरावरील महिला अत्याचार प्रतिबंधक समितीच्या सभा होत आहेत. मात्र, सवदत्ती, हुक्केरी, आणि खानापूर तालुक्यांमध्ये अधिकाऱ्यांनी अशा सभा नियमित घेण्याची आवश्यकता आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम हाती घ्यावेत. विद्यार्थिनींसाठी वसतीगृहांमध्ये सीसीटीव्ही बसवणे, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छ शौचालये, आणि किट्सचे वितरण या गोष्टींना प्राधान्य द्यावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक आर.बी. बसर्गी, प्रबेशनरी आयएएस दिनेश कुमार मीना, महिला व बालविकास विभागाचे उपसंचालक आर. नागराज, जिल्हा परिषद योजना संचालक गंगाधर दिवतार, एसीपी सदाशिव कट्टीमनी, अल्पसंख्याक कल्याण विभागाचे अधिकारी अब्दुल रशीद मिरजानवर, आणि इतर विभागांचे अधिकारी आदींसह एनजीओ प्रतिनिधींनीही या बैठकीत सहभाग घेतला होता.