बेळगाव : विजापूर येथील वकील ॲड. रवी एस. मेलीनकेरी यांच्या खून प्रकरणी योग्य पद्धतीने कसून तपास करण्याद्वारे सर्व मारेकऱ्यांना लवकरात लवकर गजाआड करून कठोर शासन केले जावे, अशी मागणी बेळगाव बार असोसिएशनने मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्याचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्याकडे केली आहे.
विजापूर येथील वकील ॲड. रवी एस. मेलीनकेरी यांच्या हत्येच्या निषेधार्थ बेळगाव बार असोसिएशनतर्फे आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
सदर मोर्चात शहर आणि जिल्ह्यातील बहुसंख्य वकिलांचा समावेश होता. वुई वॉन्ट जस्टीस सारख्या घोषणा देत जोरदार निदर्शने करत निघालेला वकिलांचा हा मोर्चाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाची सांगता होऊन गृहमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
भरधाव कारने ठोकरून फरफटत नेल्याने विजापूर येथील वकील ॲड. रवी मेलीनकेरी यांचा अत्यंत अमानुषपणे निर्घृण खून करण्यात आला. ही घटना अतिशय धक्कादायक असून या अतिशय नींद घटनेचा बेळगाव बार असोसिएशन तीव्र निषेध करते.
तसेच राज्य सरकारने ॲड. रवी एस. मेलीनकेरी यांच्या खून प्रकरणाचा कसून तपास करून आरोपींवर कठोर कारवाई होईल अशी व्यवस्था करावी. बंधुत्व म्हणून वकील सेवाभिमुख बंधुत्व निर्माण करत असतात. ग्राहकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अशा वकिलांच्या बाबतीत असे घृणास्पद कृत्य घडते हे निषेधार्ह आहे. वकिलांच्या बंधुत्वाची सुरक्षितता ही निसर्गता सर्वोपरि आवश्यक आहे आणि ती बंधुत्वाला सर्वप्रथम प्रदान करणे आवश्यक आहे.
बेळगाव बार असोसिएशन मयत ॲड. रवी मेलीनकेरी यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून त्यांना सर्वतोपरी पाठिंबा देत आहे. तरी कृपया ॲड. मेलीनकेरी यांच्या खून प्रकरणाचा योग्य प्रकारे कसून तपास करावा आणि आरोपींना तात्काळ गजाआड करून कठोर शासन करावे, अशा आशयाचा तपशील गृहमंत्र्यांना धाडण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. एस. एस. किवडसन्नावर, उपाध्यक्ष ॲड. बसवराज मुगळी, ॲड. विजय पाटील, ॲड. शितल रामशेट्टी, सरचिटणीस ॲड. यल्लाप्पा दिवटे, संयुक्त सचिव ॲड. विश्वनाथ सुलतानपुरी, ॲड. सुमितकुमार अगसगी, ॲड. इराण्णा पुजेर, ॲड. विनायक निंगानुरी, ॲड. सुरेश नागनुरी, ॲड. अनिल पाटील, ॲड. अश्विनी हवालदार आदींसह बहुसंख्य वकील उपस्थित होते.