‘देशद्रोहीला RSS समजणार नाही’; गिरिराज सिंह राहुल गांधींवर भडकले:
“देशद्रोही हे आरएसएसला समजू शकणार नाहीत”, असे प्रत्युत्तर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिह यांनी सोमवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर दिले. अमेरिकेतील टेक्सास येथील एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘आरएसएस’बद्दल टिप्पणी केली होती. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विश्वास आहे की भारत ही एक कल्पना आहे आणि आम्ही भारत हा अनेक विचारांचा देश असल्याचे मानते.” असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.
लोकसभा निवडणुकीदरम्यान कोट्यवधी भारतीयांना पीएम मोदी भारतीय संविधानाला धक्का लावत असल्याची जाणीव झाली. त्यावेळी भाजप आणि आरएसएस विरुद्धची लढाई स्पष्ट झाली, असा दावा राहुल गांधींनी केला. राहुल गांधींच्या या टीकेला भाजपने जोरदार उत्तर दिले.
‘राहुल गांधींनी इतिहासाची पाने चाळावीत’
राहुल गांधींच्या टीकेला उत्तर देताना केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणाले की, “आरएसएसची भूमिका काय आहे? हे त्यांनी त्यांच्या आजींना विचारण्याचे काही तंत्रज्ञान असेल तर त्यांनी तसे करावे अथवा त्यांनी इतिहासाची पाने चाळावीत. आरएसएसला खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी राहुल गांधींनी अनेक जन्म घ्यावे लागतील. गद्दार हे आरएसएसला समजू शकत नाहीत आणि जे देशावर टीका करण्यासाठी परदेशात जातात; ते त्याचे मर्म समजू शकत नाहीत.”
राहुल गांधी देशाची बदनामी करण्यासाठी परदेशात – गिरिराज सिंह
गिरिराज सिंह पुढे म्हणाले, “राहुल गांधी केवळ आपल्या देशाची बदनामी करण्यासाठी परदेशात जातात असे दिसते. ते या जन्मात तरी RSS ला समजून घेऊ शकणार नाहीत. कारण ती भारताच्या मूल्यांमध्ये आणि संस्कृतीत रुजली आहे”.
त्यांच्या चुकाच दंतकथा बनवतात- भाजप
काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी राहुल गांधी यांचे कौतुक केले आहे. दरम्यान, भाजप नेते अमित मालवीय यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. सॅम पित्रोदा म्हणाले होते की, त्यांचे उच्च शिक्षण, व्यापक वाचन आणि रणनीति विचार यामुळे त्यांना समजावून सांगणे सोपे नाही. राहुल गांधी यांनी टेक्सासमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करत असताना केलेल्या वक्तव्यावर पित्रोदा यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्याला उत्तर देताना मालवीय यांनी उपहासात्मक टिप्पणी केली. “कधीकधी राहुल गांधींना समजून घेणे सोपे नाही, असे त्यांचे मार्गदर्शक सॅम पित्रोदा म्हणतात. पण त्यांच्या चुकाच दंतकथा बनवतात.”