Ad imageAd image

कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीकडून 6 उमेदवार घोषित तर महाविकास आघाडीचा सावळागोंधळ संपेना …कोल्हापूर उत्तर भलत्याच ‘धर्मसंकटात’!

ratnakar
कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीकडून 6 उमेदवार घोषित तर महाविकास आघाडीचा सावळागोंधळ संपेना …कोल्हापूर उत्तर भलत्याच ‘धर्मसंकटात’!
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत महायुतीकडून सहा उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र महाविकास आघाडीचा गोंधळ अजूनही संपलेला नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांसह ज्यांची उमेदवारी निश्चित आहे ते सुद्धा बुचकळ्यात सापडले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचा गोंधळ संपणार तरी नक्की कधी? असाच प्रश्न निर्माण झाला आहे. कोल्हापुरात महायुतीकडून पहिल्यांदा भाजपकडून कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक यांना अपेक्षेप्रमाणे उमेदवारी जाहीर करण्यात आली. एक महिन्यांपूर्वी पक्षामध्ये प्रवेश केलेल्या राहुल आवाडे यांना इचलकरंजीमधून संधी देण्यात आली. त्यामुळे कोल्हापुरातील दोन मतदारसंघांमधून भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून हसन मुश्रीफ यांची उमेदवारी यापूर्वीच घोषित करण्यात आली आहे . फक्त त्यांच्या घोषणेची औपचारिकता बाकी आहे. चंदगडमधून राजेश पाटील हे विद्यमान आमदार आहेत त्यांना अजित पवारांकडून एबी फाॅर्म देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. काल (23 ऑक्टोबर) रात्री उशिरा शिवसेना शिंदे गटाकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीमधून 45 जणांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये राधानगरीमधून अपेक्षेप्रमाणे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांना संधी देण्यात आली आहे. करवीरमधून माजी आमदार चंद्रदीप नरके यांना संधी देण्यात आली आहे. कोल्हापूरमध्ये महायुतीकडून सहा उमेदवार निश्चित झाले आहेत. शिरोळवरून शिंदे गटाचा निर्णय प्रलंबित आहे. कोल्हापूर उत्तरमध्येही जोरदार संघर्ष सुरु आहे, तर हातकणंगले आणि शाहुवाडी दोन मतदारसंघ जनुसराज्य पक्षाला सुटतील अशी चिन्हे आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात किती लढती निश्चित
कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर झाले नसले, तरी लढती मात्र काही निश्चित झाल्या आहेत. कागलमध्ये हसन मुश्रीफ यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजितसिंह घाटगे यांच्याशी होणार आहे. करवीरमध्ये काँग्रेसकडून राहुल पाटील रिंगणात आहेत. त्यांचा मुकाबला चंद्रदीप नरके यांच्याशी होईल. पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर राहुल पाटील यांना उमेदवारी निश्चित आहे. राधानगरीमधून प्रकाश आबिटकर यांच्या उमेदवारीची फक्त घोषणेच्या औपचारिकता बाकी होती. आता त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी ए वाय पाटील किंवा के पी पाटील दोघांपैकी एक जण रिंगणात असतील. कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे. त्यामुळे कोल्हापूर दक्षिणमध्ये अमल महाडिक आणि ऋतुराज पाटील यांचा मुकाबला निश्चित झाला आहे.

इचलकरंजीमध्ये शरद पवारांचा उमेदवार? 
इचलकरंजीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मदन कारंडे रिंगणात असतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संभाव्य यादीमध्ये मदन कारंडे यांच्या नावाच्या समावेश आहे. त्यामुळे जर घोषणा झाली, तर त्याठिकाणी राहुल आवाडे विरुद्ध मदन कारंडे असा सामना होण्याची शक्यता आहे. चंदगडमध्ये सुद्धा राजेश पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नंदाताई बाभुळकर रिंगणात असतील. त्यांच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद निर्माण झाले असले तरी त्यांनाच उमेदवारी मिळेल यामध्ये कोणतीही शंका नाही.

शाहूवाडी आणि हातकणंगले जनसुराज्यला सुटणार? 
त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामधील करवीर, राधानगरी, कोल्हापूर दक्षिण, इचलकरंजी, चंदगड आणि कागल या मतदारसंघांमध्ये लढती निश्चित झाल्या आहेत. मात्र अजूनही कोल्हापूर उत्तर, शिरोळ हातकणंगले आणि शाहूवाडी या मतदारसंघांमधून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये तिढा असल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूर उत्तरच्या मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजप आमने सामने आले आहेत. या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत भाजपकडून मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. धनंजय महाडिक यांच्याकडून मुंबईमध्येच भेटीगाठी करून मतदारसंघ आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे, महायुतीमध्ये शाहूवाडी आणि हातकणंगले हे दोन मतदारसंघ विनय कोरे यांच्या वाट्याला जातील, अशी चिन्हे आहेत. स्वतः विनय कोरे पन्हाळामधून रिंगणामध्ये असतील, तर हातकणंगलेमधून अशोकराव माने यांना संधी दिली जाईल अशी चर्चा आहे.

शिरोळवरून गाडी अडली
शिरोळमध्ये सुद्धा शिवसेना शिंदे गटाची उमेदवारीवरून अजून स्पष्टता आलेली नाही. या ठिकाणी अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेना शिंदे गटाला साथ दिली होती. मात्र, आता त्यांच्या शाहू आघाडी पक्षाला निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे ते त्यांच्या पक्षाकडून रिंगणात असतील की दुसऱ्या यादीमध्ये शिंदेंकडून त्यांच्या नावाची घोषणा केली जाईल याकडे सुद्धा लक्ष आहे. दुसरीकडे या मतदारसंघामध्ये काँग्रेसकडूनच लढणार असल्याचे गणपतराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्या मतदारसंघावर काँग्रेसकडून दावा करण्यात आला आहे, तर ठाकरे गटाकडून माजी आमदार उल्हास पाटील इच्छुक आहेत.

आता या सगळ्या गोष्टींचा पेच लवकरच सुटेल आणि उमेदवारी जाहीर केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article