अमित शहांचे आदेश मिशन-विदर्भ
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालाची चिंता करू नका, राज्यात आपलेच सरकार येणार हा विश्वास ठेवा, राज्यातील सत्तेचा मार्ग येथूनच जातो किंबहुना राज्याच्या सत्तेची चावी विदर्भाकडे असल्याने 62 पैकी 45 जागा आपल्याला जिंकाव्याच लागतील असे आदेश भाजपचे राष्ट्रीय नेते, केंद्रीय ग्रह व सहकारमंत्री अमित शहा यांनी नागपुरात पदाधिकारी, विधानसभा प्रमुखांना दिले. भाजपच नव्हे तर महायुती म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करा, उमेदवार कुणी,कुठल्याही पक्षाचा असू द्या, विजय महायुती उमेद्वाराचाच हवा यावर भर दिला. मविआला वेळीच रोखा, शरद पवार,उद्धव ठाकरे यांना वेळीच रोखा यावरही शहा यांनी भर दिला.
आगामी विधानसभा निवडणूक भाजपने गांभीर्याने घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत मंगळवारी रेशीमबागेतील सुरेश भट सभागृहात भाजप विदर्भाची आढावा बैठक पार पडली. एकच लक्ष्य विधानसभा जिंका असे पत्रही पदाधिकारी, कार्यकर्त्यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
शहर,जिल्हा भाजपतर्फे विमानतळावर जल्लोषात स्वागत झाले.यानंतर रेशीमबागेतील सुरेश भट सभागृहात पूर्व व पश्चिम विदर्भातील 62 जागांचा आढावा घेण्यात आला. नागपूर नंतर छ्त्रपती संभाजीनगर,नाशिक व मुंबईत ते आढावा घेतील. एकंदरीत 24-25 सप्टेंबरला महायुतीच्या विविध बैठकातून जागांचा फॉर्म्युला अंतिम होणार आहे. रविवारी काँग्रेसने उपराजधानीत राजवाडा पॅलेसला नागपूरातील सहा विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक घेत काँग्रेसचा मुख्यमंत्री असे पुढचे पाऊल टाकले आहे. नागपुरातील सहाही जागा काँग्रेस लढविण्यावर ठाम आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह आजी, माजी खासदार, आमदार, विधानसभा प्रमुख, अध्यक्ष पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. माध्यमांना संघटनात्मक बैठकीपासून दूर ठेवल्या गेले. सामूहिक नेतृत्वाखाली पुढे जाण्याचे ठरविण्यात आले असताना पूर्वनियोजित जम्मू काश्मीर दौऱ्यावर असल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अनुपस्थिती चर्चेत होती. भाजपमध्येही शहरातील सहा जागावर भाजपचा दावा असताना महायुतीत अजितदादा गट व शिंदे सेना देखील प्रत्येकी एका जागेवर आग्रही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या या दौऱ्याला राजकीय महत्व आले आहे. यावेळी संघटन मंत्री डॉ उपेंद्र कोठेकर, प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे,शहर अध्यक्ष बंटी कुकडे,संजय फांजे, धर्मपाल मेश्राम,चंदन गोस्वामी प्रामुख्याने उपस्थित होते.