बेळगाव : बेंगलोर येथील छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती विटंबने प्रकरणी दोन वर्षांपूर्वी बेळगावातील शिव प्रेमी कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेल्या खटल्यातील आरोपींचा आज गुरुवारी दि. 5 रोजी तृतीय जेएमएफसी न्यायालयासमोर जवाब नोंदवून घेण्यात आला.
बेंगलोर येथे गेल्या डिसेंबर 2021 मध्ये घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती विटंबनेच्या घटनेची तीव्र पडसाद बेळगावमध्ये उमटली होती. त्यावेळी दंगल करून शांतता भंग केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी 11 जणांवर गुन्हा नोंदवून न्यायालयात खटले दाखल केले आहेत.
आरोपींमध्ये श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत जयवंत कोंडुसकर, माजी महापौर सरिता विराज पाटील, शिवसेनेचे स्थानिक नेते प्रकाश रामचंद्र शिरोळकर, शुभम विक्रांत शेळके, भारत लक्ष्मण मेणसे, नरेश राजू निलजकर, अंकुश अरविंद केसरकर, लोकनाथ उर्फ लोकेश जयसिंग राजपूत, हरीश प्रेमकुमार मुतगेकर, विनायक उर्फ पिराजी कंग्राळकर आणि मदन बाबुराव बामणे यांचा समावेश आहे.
या सर्वांवर दाखल करण्यात आलेला खटला क्र. 33 /22 आणि 34 /22 या खटल्यांसंदर्भात आज गुरुवारी बेळगावच्या तृतीय जेएमएफसी न्यायालयासमोर आरोपींचा जवाब नोंदवून घेण्यात आला. तसेच न्यायाधीशानी खटल्याची पुढील तारीख दि. 21 सप्टेंबर 2024 अशी देऊन त्यादिवशी निकाल घोषित केला जाईल असे स्पष्ट केले. आरोपींच्यावतीने ॲड. शामसुंदर पत्तार, ॲड. हेमराज बेंचन्नावर, ॲड. महेश बिर्जे आणि ॲड. वैभव कुट्रे हे काम पाहत आहेत.