बेळगाव :”मी गोकाकचा आमदार जारकीहोळी बोलत आहे”, अशी बतावणी करून पोलिसांना धमकावणाऱ्या एकाला बेळगाव पोलिसांनी अटक केल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख (एसपी) डाॅ. भीमाशंकर गुळेद यांनी आज मंगळवारी सकाळी दिली .
सुनील दासर (रा. अरभावी, ता. मुडलगी, जि. बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नांव आहे. त्याने आमदार, जिल्हा पालक मंत्री, खासदार आणि मुख्यमंत्र्यांच्या नावाचा वापर करून पोलिसांना फोन करून धमकावले आहे. “मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही केले नाही तर मी तुम्हा सर्वांची बदली करेन”, अशी धमकी त्याने दिल्याचे सांगण्यात आले. सदर व्यक्तीने गेल्या 2019 मध्ये अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता त्याच्या आईवर 2 दिवसांपूर्वी पैशाच्या व्यवहारासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातून तिची सुटका करण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
मुख्यमंत्र्यांशी आपले खास संबंध असून आपण त्याच्या मर्जीतील आहोत अशी बतावणी करून त्याने चक्क एसपी डाॅ. भीमाशंकर गुळेद आणि आयजीपी बिकाशकुमार यांना धमकावल्याचे कळते. त्याने आणखी कोणाला धमकावले आहे का? याचा तपास सुरू असून यासंदर्भात अधिक माहिती असलेल्यांनी तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख डाॅ. भीमाशंकर गुळेद यांनी केले आहे.