बेळगाव : खड्डे पडून चाळण झालेल्या तिसरा रेल्वे गेट ओव्हर ब्रिज अर्थात उड्डाण पुलाच्या रस्त्याची आज गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्वतः जातीने भेट देऊन पाहणी केली. तसेच रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना संबंधित अभियंत्यांना दिल्या.
प्रारंभापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या तिसरा रेल्वे गेट येथील ओवहर ब्रिजचे काम निकृष्ट झाले आहे. ब्रिजच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट प्रतीचे करण्यात आल्यामुळे मागील पंधरा दिवसात ब्रिजच्या काँक्रीटवरील सर्व डांबरीकरण उखडून ठिकठिकाणी अपघाताला निमंत्रण देणारी खडी साचली आहे. ब्रिजवरील रस्ता अनेक ठिकाणी खचला असून बरेच जीवघेणे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी वारंवार लहान-मोठे अपघात घडत आहेत.
परवाच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे या ब्रिजवर अवघ्या अर्ध्या तासात दुचाकींचे दोन ते तीन अपघात घडले. त्याचप्रमाणे दोन दिवसांपूर्वी दुचाकी खड्ड्यामध्ये अडकून रस्त्यावर पडल्यामुळे उद्यमबाग येथील कामगाराला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तिसऱ्या रेल्वे गेट ओव्हर ब्रिजवरील दुर्दशा झालेल्या रस्त्यासंदर्भात अनेकांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत तक्रारी केल्या होत्या.
सदर समस्येची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज गुरुवारी सकाळी स्वतः ब्रिजवरील रस्त्याची संपूर्ण पाहणी करत अधिकाऱ्यांना रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना केल्या आहेत.