खानापूर : व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण व्यक्ती ही कधीतरी संपते पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते. याचं वाक्याचे अनुकरण अनगडी ग्रामस्थांनी केल आहे. श्री ग्रंथराज पारायण सोहळ्यानिमित अनगडी गावात एक अनोखा उपक्रम आयोजित केला गेला. गावातील तरुणांना व गावकऱ्यांना गावातील जेष्ठ व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्याची कल्पना सुचली आणि आदर्श नागरी सत्कार आयोजित केला. प्रत्येक गावात अनेक वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात पण अनगडी गावाने आपल्या गावातील जेष्ठ वयोवृद्धांचा व शासकीय सेवेतून निवृत झालेल्यांचा सत्कार समारंभ आयोजित करून इतरांसंमोर आदर्श निर्माण केला आहे.
तुमच्याही मनात विचार आला असेल, की अनगडी हरिनाम सप्ताह कमिटीने हा आजी-आजोबांचा सत्कार का आयोजित केला असेल? कारण…… या मंडळींनी अगदी साध्या साधनांवर आपल्या संसाराचं मोठं वटवृक्ष फुलवलं. खरं तर, ही कसरत तुम्ही आम्ही पाहिली नसून, तर अनेकांनी अनुभवली आहे. या मंडळींपैकी काहींनी दिवस-रात्र शेतात राबून गावातील अन्नाची आणि दुधाची कमतरता भासू दिली नाही, तर काहींनी वनस्पतींचा अभ्यास करून गावाची आरोग्य व्यवस्था सांभाळली. काहींनी आपल्या मातृवत प्रेमाने संपूर्ण गावाची काळजी घेतली, तर काहींनी संत परंपरेतील श्रद्धा आणि ज्ञानाची ज्योत कायम ठेवली.
या सर्व गोष्टींनी आपल्याला अभिमान वाटतो, कारण या सर्वांनी वयोमानाचा आदर ठेवून निरोगी आयुष्य जगलं आहे. घरातील आजी दारात आलेल्या व्यक्तीचा फक्त आवाज ऐकून त्याला ओळखते, तर आजोबा नावाची हाक ऐकून माझ्याशी साधतात. त्यांची ही शारीरिक क्षमता आजही कायम आहे, आणि त्यांचा अनुभव खरोखरच प्रेरणादायी आहे.
गरीबी कधीच वरदान नसते, पण या मंडळींकडे पाहिलं की त्यांच्या निरोगी आयुष्याचं रहस्य साध्या जीवनशैलीतच आहे असं वाटतं. पिझ्झा-बर्गर, कोल्ड्रिंक्सपासून दूर राहून त्यांनी नाचणी, ज्वारी, बाजरी आणि गावातील नैसर्गिक अन्नाचा आस्वाद घेतला. त्यांनी जंगलातील रानमेवा आणि नदीतील मासे खाऊन आपल्या जीवनाला साधेपणाने जगलं.
या मंडळींनी कधीच आपल्या आहाराबाबत तक्रार केली नाही. त्यांच्या साध्या जीवनशैलीमुळेच आज त्यांना रक्तदाब, मधुमेह किंवा सांधेदुखी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत नाही. जर ‘आरोग्य हीच खरी संपत्ती आहे’ असं मानलं, तर या मंडळींनी सर्वात मोठी संपत्ती मिळवली आहे.
विज्ञान सांगतं की काही गुण आई-वडिलांकडून मिळतात, तर काही आजी-आजोबांकडून. त्यामुळे त्यांच्या निरोगी शरीराचं वारसाही आम्हाला मिळालेला आहे. त्यांनी दिलेला हा शारीरिक वारसा आणि मानसिक शक्ती आपल्याला भविष्यात मदत करेल.
आजच्या सत्काराने आपण केवळ काही लोकांचा सन्मान करत नाही, तर आपल्या गावातील प्रत्येक वयोवृद्ध व्यक्तीचा आणि पूर्वजांचा सन्मान करत आहोत. त्यांनी दिलेल्या परंपरांमुळेच आज आपलं अस्तित्व आहे.