Shivsena MLA Balaji Kalyankar: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातलं राजकीय वातावरण चांगलच तापू लागलं आहे. महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी जागावाटपाची चर्चा जवळपास संपली आहे. भारतीय जनता पक्षाकडून ९९ उमेदवारांची पहिली यादीही जाहीर करण्यात आली असून मविआचं जागावाटप मंगळवारी जाहीर केलं जाणार असल्याचं नाना पटोलेंनी सांगितलं आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये आता मतदारांकडे उमेदवार मतांचा जोगवा मागण्यासाठी पोहोचले असताना त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रतिसादाच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. नांदेडच्या निळा गावातला असाच एक प्रसंग सध्या चर्चेत आला आहे.
लोकसभा निवडणुकांच्या आधी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरणाच्या मुद्द्यावरून सरकारविरोधात व विशेषत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात शड्डू ठोकले होते. या निवडणुकांत भारतीय जनता पक्षाच्या झालेल्या पीछेहाटीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील मराठा समर्थकांची नाराजी हे देखील एक कारण असल्याचं सांगितलं जातं. आता विधानसभा निवडणुकीत तर मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर नांदेडच्या निळा गावात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांना आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे.
नेमकं घडलं काय?
वृत्तानुसार बालाजी कल्याणकर हे एका गावात भेटीसाठी गेले असता त्यांना बैठकीमध्येच गावकऱ्यांचा व मराठा आंदोलकांच्या प्रश्नांचा सामना करावा लागला. बालाजी कल्याणकर हे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे विद्यमान आमदार आहेत. यंदाही त्यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी जनसंपर्कासाठी भेटीगाठी सुरू केल्या असताना त्यांना हा अनुभव आला.
निवडणुकीचे वर्षविजयीपक्ष
२०१९बालाजी देवीदास कल्याणकरशिवसेना
२०१४डी. पी. सावंतकाँग्रेस
२००९डी. पी. सावंतकाँग्रेस
नांदेडच्या निळा गावात बालाजी कल्याणकर गेले असता तिथल्या काही गावकऱ्यांसमवेत त्यांनी चर्चा केली. मात्र, यावेळी गावातील एका वृद्ध व्यक्तीने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बालाजी कल्याणकरांना जाब विचारला. “समाजासाठी तुम्ही काय केलं सांगा? आरक्षणासाठी कोण बोललं सांगा. आलं का कुणी समाजासाठी? स्वत:साठी पक्ष बदलता, स्वत:साठी काहीही करता. पण समाजासाठी यांनी काहीच केलं नाही. समाजासाठी काय केलं तुम्ही? तुम्ही कुठे म्हणाले आरक्षण द्या”, असं ही वृद्ध व्यक्ती म्हणत असल्याचं दिसत आहे.
सदर व्यक्ती मराठा आरक्षण आंदोलक असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटलांवर विश्वास दाखवत ते म्हणतील तसंच होईल, असंही म्हटलं. “मनोज जरांगे पाटील म्हणाले तसं होणार. त्यांच्या मनाप्रमाणे होणार. त्यांनी सांगितलंय जिथं कुणाला पाडायचंय त्याला पाडायचंय. जिथे कुणाला निवडून आणायचंय त्याला आणायचं. त्यांच्या शब्दावर आता हे सगळं चालणार”, असं हे गृहस्थ आमदार बालाजी कल्याणकर यांना म्हणाले.