WTC Final Team India : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ सध्या सुरू असलेल्या WTC हंगामाच्या फायनलमध्ये पोहचण्याची सर्वाधिक शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC ने नुकतेच याचे समीकरण जाहीर केले आहे.
यापूर्वीच्या दोन हंगामांची अंतिम फेरी टीम इंडियाने गाठली होती, दोन्ही वेळेला विजेतेपदाने हुलकावणी दिली. पहिल्यांदा न्यूझीलंडकडून तर दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाकडून पराभवा पत्कारावा लागला. आता रोहितसेनेची नजर सलग तिसऱ्या WTC फायनलमध्ये पोहोचून विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याकडे असेल. भारत सध्या 68.52 टक्के सर्वाधिक गुणांसह WTC पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे.
WTC फायनलचे समीकरण
भारताच्या खात्यात सध्या 68.52 टक्के गुण आहेत. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या चक्रात तीन संघांविरुद्ध आणखी 10 कसोटी सामने खेळायचे आहेत. जर भारत 10 पैकी 10 कसोटी सामने जिंकण्यात यशस्वी झाला तर त्यांच्या विजयाची टक्केवारी 85.09 होईल आणि संघ अव्वल स्थानी राहिल. तथापि, टीम इंडियासाठी हे करणे थोडे कठीण आहे. कारण भारताला या 10 पैकी 5 कसोटी सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच भूमीवर खेळायचे आहेत.
भारताच्या नजरा घरच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या इतर 5 कसोटी सामन्यांवर असतील. रोहितसेना 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत. यानंतर त्यांना न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामने खेळायचे आहेत. जर भारतीय संघ मायदेशातील या पाच कसोटी जिंकण्यात यशस्वी ठरला, तर संघाची विजयाची टक्केवारी 79.76 होईल, अशा परिस्थितीतही टीम इंडिया अंतिम फेरी गाठण्यासाठी प्रबळ दावेदार असेल.
जर गतविजेत्या ऑस्ट्रेलियाबद्दल सांगायचे झाले तर ते भारताविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेव्यतिरिक्त श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळ्ताने खेळायचे आहेत. जर कांगारू हे सर्व कसोटी सामने जिंकण्यात यशस्वी ठरले तर त्यांच्या विजयाची टक्केवारी 76.32 असणार आसेल. जे अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी पुरेसे असेल.
न्यूझीलंडची शक्यता ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त?
न्यूझीलंडची WTC फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता सध्या ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त आहे. कारण त्यांना 78.57 च्या विजयी टक्केवारीपर्यंत मजल गाठण्याची संधी आहे. किवी संघ श्रीलंकेविरुद्ध दोन आणि भारताविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे, त्यानंतर किवी संघ तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. त्यामुळे न्यूझीलंडला अधिक गुण मिळवण्याची संधी आहे. सध्या न्यूझीलंडच्या खात्यात 50 टक्के गुण आहेत आणि हा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.
बांगलादेशही 72.92 टक्के गुणांपर्यंत पोहोचू शकतो
भारताविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर बांगलादेशला घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि वेस्ट इंडिजविरुद्ध समान सामन्यांची मालिका खेळायची आहे. अशा परिस्थितीत हे 6 सामने त्यांच्यासाठी WTC फायनलचे दरवाजे उघडू शकतात.
इतर संघांचे समीकरणही जाणून घेणे आवश्यक आहे. श्रीलंकेच्या विजयाची टक्केवारी जास्तीत जास्त 69.23 पर्यंत पोहोचू शकते, तर इंग्लंड 57.95, दक्षिण आफ्रिका 69.44, पाकिस्तान 59.52 आणि वेस्ट इंडिज 43.59 अशा विजयी टक्केवारीपर्यंत पोहोचू शकतात. सध्या इंग्लंड, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज हे संघ डब्ल्यूटीसी अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडलेले दिसत आहेत.