आज जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त फोटोग्राफीचे महत्व काय आहे ते जाणून घेऊ, खरं तर छायाचित्रण ही एक कला आहे ज्यामध्ये छायाचित्रांद्वारे सर्व परिस्थिती काहीही न बोलता सांगितली जाते. याच फोटोग्राफीला एक मोठा इतिहास आहे. ऑगस्ट महिन्यात जगभरातील छायाचित्रकार त्यांची क्लिक केलेली उत्कृष्ट छायाचित्रे विविध मंचांवर शेअर करतात आणि 19 ऑगस्ट रोजी अनेक छायाचित्रकारांना सन्मानित करण्यासाठी जागतिक छायाचित्रण दिन साजरा केला जातो.
आयुष्यातील महत्त्वाचे क्षण जपून ठेवण्यासाठी फोटोज महत्त्वाचे ठरतात,असे म्हणतात की एखादा क्षण अमर करायचा असेल तर तो कॅमेर्यात कैद करावा. पूर्वी कॅमेरे नसताना व्यक्ती त्यांची सर्जनशीलता व्यक्त करण्यासाठी रेखाचित्र हे एक सशक्त माध्यम वापरत होते. प्राचीन लेण्यांमध्ये त्यांनी साकारलेली भित्तिचित्रे या वस्तुस्थितीची साक्ष देतात. मात्र आता परिस्थिती बदलली असून आजच्या या डिजिटल युगात Digital Camera ने रेखाचित्राची जागा घेतली आहे. अशात 19 ऑगस्ट रोजी जगभरात ‘जागतिक छायाचित्रण दिन’ साजरा केला जात आहे.
‘जागतिक छायाचित्रण दिन’ का साजरा केला जातो यामागे एक इतिहास दडलेला आहे. फोटोग्राफीचा उगम 9 जानेवारी, 1839 रोजी फ्रान्समध्ये झाला. जगातील पहिली फोटोग्राफी प्रक्रिया म्हणून डग्युरिओटाइप प्रक्रिया मानली जाते. फ्रान्सच्या जोसेफ निसेफोर आणि लुई डगर यांनी ही प्रक्रिया सुरू केली आणि 19 ऑगस्ट 1839 रोजी फ्रेंच सरकारने या शोधाची घोषणा केली आणि त्याचे पेटंट मिळवले. तेव्हापासून या दिवसाची आठवण म्हणून ‘जागतिक छायाचित्रण दिन’ साजरा केला जातो. जागतिक परिस्थिती असो वा महामारी किंवा युद्ध असो किंवा वन्यजीव असो, या आणि अशा किती तरी विषयांवर क्लिक केलेल्या छायाचित्रांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे आणि या विषयांवर क्लिक केलेल्या चित्रांनी अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही जिंकले आहेत.
जागतिक छायाचित्रण दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या कामाला प्रोत्साहन देणे हा आहे. आज फोटोग्राफी हा एक उत्तम करिअर पर्याय म्हणून उदयास आला आहे. फोटोग्राफी हे अनेक लोकांच्या उत्पन्नाचे साधन झाले आहे. या दिवशी या क्षेत्रात योगदान दिलेल्या व्यक्तीचे स्मरण केले जाते.