नवी दिल्ली : देशात टोमॅटोने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. अवघ्या महिन्यातच टोमॅटोने 300 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. त्यांचा खिशावर भार पडला आहे. 25-30 रुपये किलो असणारे टोमॅटो आता थेट 100-180 रुपये किलो दरम्यान विक्री होत आहे. सामान्य नागरिकांना एकतर टोमॅटो जेवणातून हद्दपार केले आहेत अथवा त्यांचा वापर मर्यादीत केला आहे.
टोमॅटोमुळे शेतकरी, व्यापारी, दलाल मालामाल झाले आहेत. यासंबंधीच्या अनेक रोचक कथा दररोज आपल्यासमोर येत आहे. अशीच एक जबरदस्त गिफ्ट समोर आले आहे. एका मुलीने आपल्या आईसाठी परदेशातून 10 किलो टोमॅटो आणले आहे. एवढ्या महागाईत यापेक्षा मोठं गिफ्ट कोणतं असेल, नाही का?
मुंबईतील एका महिलेला नातेवाईकांनी वाढदिवसाला टोमॅटो गिफ्ट दिले होते. या महागाईत यापेक्षा महागडे गिफ्ट कोणते असेल, म्हणून ही भेट देण्यात आली. मध्यप्रदेशमध्ये पतीने भाजीत तीन टोमॅटो चिरुन टाकल्याचा राग येऊन पत्नीने घर सोडले. काही बॉलिवूड सेलिब्रिटिंनी टोमॅटो त्यांना परवडत नसल्याचा दावा केला. शेतकऱ्यांच्या तर टोमॅटोने दम आणला. टोमॅटो चोरीच्या घटनांमुळे त्यांना शेतात रात्री खडा पहारा द्यावा लागत आहे. टोमॅटो स्मगलिंग होत असल्याचे बिहार, उत्तर प्रदेशमधील अनेक घटनांतून समोर आले आहे.