मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले आहे. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांपासून अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांच्या निधनानं मराठी चित्रपट सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
81 वर्षीय अभिनेत्रीने पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्या अल्झायमर या आजाराने ग्रस्त होत्या. ‘सरस्वतीचंद्र’ (1968), ‘आनंद’ आणि ‘ड्रीम गर्ल’ (1977) या हिंदी चित्रपटांमध्येही सीमा देव यांनी काम केले आहे.
अभिनेत्री सीमा देव आणि त्यांचे पती अभिनेते रमेश देव हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील अतिशय नावाजलेले कलाकार आहेत. त्यांच्या ‘सुवासिनी’ , ‘जगाच्या पाठीवर’, ‘आनंद’ अशा अनेक चित्रपटांमधील भूमिका विशेष गाजल्या. त्यांचा मुलगा अजिंक्य देवही प्रसिध्द अभिनेता आहे.
सीमा देव यांना अल्झायमरचा त्रास सुरु झाला होता. सीमा यांचा मुलगा अजिंक्य देव यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे शेयर करत आई लवकर बरी होऊ दे यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन त्यांनी चाहत्यांना केले होते. अखेर काळाने घाला घातला आणि सीमा देव यांनी जगाचा निरोप घेतला.