बेळगाव : आपटेकर स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून क्रीडापटू, मिस्टर इंडिया बहुमान पटकाविणारे सुनील आपटेकर यांच्या वतीने बेळगावमध्ये येत्या १८ ऑगस्ट रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. १८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६.०० वाजता जिल्हा क्रीडांगणावर या स्पर्धेचे उद्घाटन होणार असून या पार्श्वभूमीवर आज मॅरेथॉन स्पर्धेचे चषक आणि टी शर्टचे अनावरण करण्यात आले.
विजय हॉस्पिटल येथे आज आपटेकर स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्यावतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. डॉ. रवी पाटील, अजित आपटेकर, सुनील आपटेकर सिद्धनवर, विलास पवार, जगदीश आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मॅरेथॉन स्पर्धेचे चषक आणि टी शर्टचे अनावरण करण्यात आले.
या स्पर्धा ३ किलोमीटर, ५ किलोमीटर आणि १० किलोमीटर अशा विभागात आयोजित करण्यात आल्या असून दिव्यांग क्रीडापटूंसाठी व्हील चेअरच्या माध्यमातून मॅरेथॉन स्पर्धा आयोजित आहेत. ३ किलोमीटर मॅरेथॉन धावण्यासाठी १० वर्षाखालील, ११ ते १३ वयोगटातील, १४ ते १६ वयोगटातील, आणि खुल्या गटातील स्पर्धा घेण्यात येणार आहेत. हि स्पर्धा जिल्हा क्रीडांगणापुरती मर्यादित असेल. तसेच या स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्या स्पर्धकांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. ५ किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा जिल्हा क्रीडांगणापासून ते राणी कित्तूर चन्नम्मा चौक आणि पुन्हा जिल्हा क्रीडांगण या मार्गावर आयोजित असून या स्पर्धेत १५-३०, ३१- ४५, आणि ४५ वर्षाहून अधिक अशा तीन गटात स्पर्धा होणार आहे. यातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला रुपये ४००० आणि मानचिन्ह, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याला रुपये २००० आणि मानचिन्ह तसेच तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला रुपये १००० आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
१० किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा जिल्हा क्रीडांगणापासून ते राणी कित्तूर चन्नम्मा चौक, कॉलेज रोड मार्गे मिलिटरी महादेव आणि पुन्हा जिल्हा क्रीडांगण या मार्गावर आयोजिली असून या १५-३०, ३१-४५, आणि ४५ वर्षाहून अधिक अशा तीन गटात स्पर्धा होणार आहे.
यातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला रुपये ८००० आणि मानचिन्ह, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याला रुपये ५००० आणि मानचिन्ह तसेच तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला रुपये ३००० आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांसह मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या स्पर्धकांसाठी अल्पोपहाराची सोय देखील करण्यात आली असून प्रथमोपचार, आरोग्यसेवा, मॅरेथॉन मार्गावर पाण्याची व्यवस्था आणि स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला टीशर्ट पुरविण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीकरिता-
७०१९७०५८५९,
८२८३८७५१५०,
७०१९०५३१२२
या क्रमांकावर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.