Uddhav Thackeray Dasara Melava Update 2024 : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची सुरुवात केली होती. तीच परंपरा आता उद्धव ठाकरे पुढे नेत आहेत. मात्र, शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांकडून आज स्वतंत्रपणे दसरा मेळावा आयोजित केला होता. महत्त्वाचे म्हणजे यंदाचा दसरा मेळावा विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर असल्याने दोन्ही मेळाव्यांकडे राज्याचे लक्ष लागलं होतं. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानात आयोजित करण्यात आला होता. तर उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा परंपरेनुसार दादर येथील शिवाजी पार्क मैदानात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे) तसेच पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.
माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी महाराष्ट्र लुटू देणार नाही – उद्धव ठाकरे
माझ्यात जीव असेपर्यंत मी महाराष्ट्र लुटू देणार नाही. शेवटच्या श्वासपर्यंत मी हा महाराष्ट्र मी मोदी शाह यांचा महाराष्ट्र होऊ देणार नाही. हा शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र मी मोदी-शाहांच्या हातात जाऊ देणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
आज न्यायमंदिराचा दरवाजा ठोठावून हात दुखतोय पण आम्हाला न्याय मिळाला नाही. – उद्धव ठाकरे
न्यायमंदिराचा दरवाजा ठोठावून आमचा हात दुखत आहे. पण आम्हाला न्याय मिळाला नाही. आम्हाला न्यायदेवता पावत नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
आनंद दिघे असते तर त्यांनीही ठाण्यातल्या शिंदेला गोळ्या झाडल्या असत्या – उद्धव ठाकरे
ठाण्यातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी शिंदेला मारायलाच हवे होते. आनंद दिघे असते तर त्यांनीही हेच केलं असंत. पण भाजपाच्या लोकांना वाचवण्यासाठी त्याला गोळी मारली असेल तर त्याचा उलगडा झालाच पाहिजे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
आमचं सरकार आल्यावर आम्ही धारावीचं कंत्राट रद्द करू – उद्धव ठाकरे
अदाणींच्या हातात मुंबईत देत असाल तर आमचं सरकार आल्यावर आम्ही धारावीचं कंत्राट रद्द करू, आम्ही तिथे पोलिसांना जागा देऊ. वांद्रेची जागा आम्ही सरकारी कर्मचाऱ्यांना दिली होती. मात्र, शिंदेंनी ही जागा कोर्टाला दिली. आमचं सरकार आल्यावर आम्ही सरकारी कर्मचाऱ्यांना जागा देऊ, असं आश्वासनही ठाकरे यांनी दिलं.
सरकारने तीन लाख कोटी रुपये कंत्राटदारांवर उधळले – उद्धव ठाकरे
सरकारने तीन लाख कोटी रुपये कंत्राटदारांवर उधळले. राज्य सरकारची कर्ज घेण्याची मर्यादा असते. त्यांनी ही मर्यादा ओलांडली आहे. हे सरकार कर्ज काढून फटाके फोडत आहेत. तर सर्व समान्यांना दिवाळी साजरी करत असल्याचे दाखवत आहेत. आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती गंभीर आहे. अदाणींना खूप काही दिलं आहे. चंद्रपूरच्या खदाणी, शाळा, धारावी, मिठागरे ही सर्व या सरकारने अदाणींना दिलं आहे. रक्त सांडवून आम्ही मुंबई मिळवली आहे. ही अदाणींनी भेट म्हणून दिलेली नाही, असेही ठाकरे म्हणाले.
अमित शाह यांनी आधी भाजपा सांभाळावी – उद्धव ठाकरे
अमित शाह यांनी आधी भाजपा सांभाळायला हवी. मी मध्यंतरी नागपूरला गेलो होतो तिथे लोकांनी सांगितलं की शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. बॅंक कर्ज देत नाही. निसर्ग साथ देत नाही. कापसाच्या बोंडावर अळी येते तिला गुलाबी अळी म्हणतात. भाजपाच्या झाडाला दाढीवाला खोडकिडा लागला आहे आणि बोंडावर गुलाबी अळी पडली आहे, भाजपाला फक्त सत्ता हवी आहे. त्यालाच सत्ताजिहाद म्हणतात, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
जातीजातीत भांडण लावण्याचं काम भाजपा करत आहेत – उद्धव ठाकरे
भाजपाने धनगरांना आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, त्यांना अद्यापही आरक्षण दिलेलं नाही. मुळात जातीजातीत भांडण लावण्याचं काम भाजप करत आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली .
आताची भाजपा संघाला मान्य आहे का?; उद्धव ठाकरेंचा सवाल
आताची भाजपा संघाला मान्य आहे का, आम्हाला ही भाजपा मान्य नाही. तेव्हाचा भाजपा पवित्र होता. आताचा भाजपा हॅब्रिड झाला आहे. हा भाजपा आमच्यावर राज्य करून शकत नाही. भारतीय जनता पक्षाला भारतीय म्हणाला लाज वाटली पाहिजे. जनतेचा पक्ष आता राहिला नाही. ते चोरांना गद्दारांना डोक्यावर बसवत आहेत, अशी टीका ठाकरे यांनी केली.
मोदींना शिवाजी महाराज म्हणजे मतं मिळवण्याचं यंत्र वाटतं – उद्धव ठाकरे
मोदींना शिवाजी महाराज म्हणजे मतं मिळवण्याचं यंत्र वाटतं. त्यांनी महाराजांचा वापर ईव्हीएमसारखा करू नये. जो महाराजांच्या मंदिराला विरोध करेन त्यांना महाराष्ट्र बघून घेईन. संघाला १०० वर्ष होत आहेत. मला मोहन भागवत यांच्याबाबत आदर आहे. पण त्यांच्या कामाबाबत मला आदर नाही. त्यांनी हिंदूना एकत्र येण्यासाठी सांगितलं आहे. पण १० वर्ष सत्तेत असताना हिंदू धोक्यात आहे, असंही ठाकरे म्हणाले.
आमचं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिलह्यात शिवाजी महाराजांचे मंदिर बांधू – उद्धव ठाकरे
काही लोक आपल्यावर चालून येत आहे. त्यांचा राजकीय शिरच्छेद केलाच पाहिले. आजचा दसरा रामाने रावणाचा वध केला म्हणून साजरा करतो. प्रभू रामांबरोबर वानरसेना होती. ते आमचे देव आहेच. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजही आमचे देव आहेत. ते मत मिळवण्याची मशिन नाहीत राजपाने मतांसाठी महाराजांचा पुतळा उभारला. त्यातही त्यांनी पैसे खालले आमचं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिलह्यात शिवाजी महाराजांंचे मंदिर बांधू, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं.
आम्हाला भाजपाला खांदा द्यायचा आहे. – उद्धव ठाकरे
हिंदुत्वं आमचा श्वास, मराठी आमचा प्राण, अदाणी आमची जान, आम्ही शेठजींचे श्वान अशी मिंधेंची जाहिरात आहे. मिंधे हे लांडगे आहेत. त्यांनी वाघाचं कातळं घातलं आहे. हे महाभारत आहेत. कौरव १०० होते. पांडव ५ होते. शकुनी मामा कोण सर्वांना माहिती आहे. भाजपा शिवसेनेला संपवायला निघाला आहे. आम्ही त्यांना साथ देऊन चुकी केली. ते आमचं पाप आहे. आम्हाला भाजपाला खांदा द्यायचा आहे. महाभारतासाठी परिस्थिती आमच्यावर आहे. माझ्याच परिवारातील लोक माझ्या विरोधात उभे आहेत. त्यामुळे कृष्णाने सांगितल्याप्रमाणे आम्ही शत्रुंना ठेचणार, असं ठाकरे म्हणाले.
मला दिल्लीश्वरांची परवा नाही – उद्धव ठाकरे
ही लढाई सोपी नाही. एकीकडे अब्दाली सारखी माणसं आहेत. पण त्यांना कल्पना नाही की ही शिवसेना आहे. जनता ही वाघनखं आहेत. सगळं ओरबाडून घेतल्यानंतरही जनता माझ्या बरोबर राहिली. त्यामुळे मला दिल्लीश्वरांची परवा नाही. त्यांच्या छातीत भगवा गाडून मी उभा आहे. इथला शिवसैनिक मशाल बनवून सरकारला चूड लावल्याशिवाय राहणार नाही, असं ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला दसऱ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
आज मोरू दिल्लीत मुख्यमंत्री पदासाठी चकरा मारतो आहे – एकनाथ शिंदे
सर्वसामान्याच्या जीवनात बदल घडून आणायचा आहे. आम्ही गिरणी कामगारांना घरं दिली आहे. त्यांच्या कष्टामुळेही मुंबईत उभी राहिली आहे. मुंबईत झोपडपट्टी मुक्त करायची आहे. जे प्रकल्प रखडलेले आहेत. ते सर्व प्रकल्प आमचे सरकार पूर्ण करणार आहे. मुंबईतून बाहेर गेलेला मुंबईकर परत मुंबईत आणायचा आहे. अनेक कामात मी निर्णय घेतो, त्यामुळे महाविकास आघाडीचे काळे धंदे बंद झाले आहेत. त्यामुळे रोज आमच्यावर टीका केली जात आहे. आम्ही फेसबूक लाईव्ह नाही, तर फेसटूफेस काम करणारे लोक आहोत. आम्ही उठाव केला नसता, तर मोरू उठला असता आणि आंघोळ करून झोपला असता. आता हाच मोरू दिल्लीत चकरा मारतो आहे. मुख्यमंत्री पदासाठी दिल्लीवारी सुरु आहे, अशी टीकाही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
याच दाढीवाल्याने महाविकास आघाडी उद्धवस्त केली – एकनाथ शिंदे
माझ्या दाढीवरून माझ्यावर टीका केली जाते. मात्र, याच दाढीवाल्याने महादिकास आघाडी उद्धवस्त केली. त्यामुळे मला हलक्यात घेऊ नका, मी घरात बसणारा मुख्यमंत्री नाही, अशा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.
मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, मला हलक्यात घेऊ नका – एकनाथ शिंदे
मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आनंद दिघे यांचा चेला आहे. मला हल्क्यात घेऊ नका. मी मैदान सोडत नाही. आज महाराष्ट्रात एकनाथ शिंदे जातो तिथे माझं स्वागत करतात आशिर्वाद देतात. हेच आपण कमावलं आहे. दोन वर्षात आपलं सरकार लाडकं सरकार झालं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
काही लोकांना हिंदू शब्दाची लाज वाटते – एकनाथ शिंदे
काही लोकांना हिंदू शब्दाची लाज वाटते आहे. हिंदूहृदयसम्राट म्हणायला जीभ कतरत आहेत. पण आपल्याला या शब्दाचा अभिमान आहे. बाळासाहेबांच्या विचाराशी बेईमानी करणाऱ्यांपासून आपण शिवसेना मुक्त केली, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.