बेळगाव : दरवर्षी प्रमाणे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी 31 डिसेंबर रोजी तरुणाईसह सर्वचजण जल्लोष साजरा करतात. मात्र गेल्या काही वर्षात शहर परिसरात हुल्लडबाजीचे प्रकार वाढले असून अनेक अनुचित घटना घडत असल्याचे समोर आले आहे.
अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस विभागाने यंदा खबरदारी घेतली असून हुल्लडबाजी करणाऱ्यांना आळा घालत थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन अंडर कंट्रोल आणण्यासाठी पोलीस विभागाने करडी नजर ठेवली आहे.
मंगळवारी रात्री संपूर्ण शहरात पोलिसांची गस्त राहणार आहे. शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी दिला आहे. शहरातील प्रत्येक अधिकारी या रात्री विशेष गस्तीवर असणार आहे.
तसेच, नशेत गोंधळ घालणाऱ्यांवर, तसेच मोटारसायकलवर दोनपेक्षा अधिक जणांना घेऊन सुसाट वेगाने चालणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. यासाठी सर्व तयारी पूर्ण केली गेली आहे. नागरी पोलिस, गृहरक्षक दलाचे जवान आणि अतिरिक्त तुकड्या सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.
मध्यरात्री एकपर्यंत नागरिकांना उत्सवाची मुभा असणार आहे, परंतु त्याआधी प्रत्येकाने आपले घर गाठले पाहिजे. रात्री एक वाजल्यानंतर अनावश्यकपणे रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
प्रमुख रस्त्यांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. पोलीस प्रशासनाची दक्षता कायम ठेवण्यात आली असून नववर्ष स्वागतादरम्यान कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी सर्व उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.