बेळगाव : दरवर्षीप्रमाणे खंडेनवमी व विजयादशमीच्या निमित्ताने बाजारपेठेत एकच गर्दी झाल्याचे पहावयास मिळत आहे. सध्या बाजारपेठेत ऊस, फुले, फळे त्याचप्रमाणे वाहन, कपडे, सोने-चांदी यांच्या खरेदी विक्रीला ऊत आला असून बाजारपेठ ग्राहकांच्या गर्दीने फुलली आहे.
खंडे नवमीला शस्त्रपूजा असल्याने शहराच्या मुख्य बाजारपेठेत गणपत गल्ली, काकती वेस रोड, पांगुळ गल्ली, मारुती गल्ली, समादेवी गल्ली, नरगुंदकर भावे चौक आदी ठिकाणी ऊस, फुलांची विक्री तेजीत असल्याचे पहावयास मिळत आहे.
दसऱ्याला नवीन कपडे खरेदी, सोने, वाहन खरेदी करण्याची परंपरा असल्यामुळे शहरातील सराफी दुकाने सोन्या-चांदीचे शोरूम्स तसेच ऑटोमोबाईल शोरूम्स या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे विशेष गर्दी दिसत आहे. बेळगावची कपड्याची बाजारपेठ मोठी असल्यामुळे गोव्यासह महाराष्ट्रातील चंदगड व अन्य भागातील अनेक नागरिक खरेदीसाठी बेळगावात दाखल झाले आहेत.
गेल्या कांही महिन्यांपासून सोने दरात वाढ झाली असली तरी ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. भविष्यातील गुंतवणूक किंवा गरज म्हणून काहींनी नवीन वास्तू खरेदीस पसंती दिली आहे. वाहन उद्योगात समाधानाचे वातावरण आहे.
चारचाकी व दुचाकी वाहने खरेदी करण्याबरोबरच अनेक जण नवे मोबाईल फोन घेण्यास प्राधान्य देत आहेत. एकंदर सकारात्मक चित्र पाहता दसऱ्याच्या निमित्ताने यंदा देखील शहराच्या बाजारपेठेत कोट्यावधीची उलाढाल होत आहे.