आज (21 ऑक्टोबर) वसूबारस (Vasu Baras) साजरी करत दिवाळीची (Diwali) सुरूवात झाली आहे. वर्षभरातील सणाच्या यादीमधला मोठा सण म्हणजे दिवाळी! दिवाळीच्या दिवसात सणाला सुरुवात होते ती वसूबारस पूजनाने म्हणजे गाय आणि वासरू यांच्या पूजनाने, त्यानंतर धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि त्यापाठोपाठ दिवाळी पाडवा आणि भाऊबीज साजरी केली जाते.
यंदा दिवाळीच्या दिवसात सूर्यग्रहणही आलं असल्याने अनेकांच्या मनात दिवाळी सेलिब्रेशन बाबत काही प्रश्न आहेत. त्यापैकीच एक दिवस म्हणजे धनतेरस किंवा धनत्रयोदशी नक्की कधी आहे?
दिवाळीच्या दिवसामध्ये अश्विन कृष्ण त्रयोदशी दिवशी प्रदोषकाळी धनतेरस साजरी करण्याची प्रथा आहे. प्रसिद्ध पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार 22 ऑक्टोबर दिवशी संध्याकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी द्वादशी संपून त्रयोदशी सुरू होणारआहे. या दिवशी प्रदोषकाळ संध्याकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी सुरू होणार असून रात्री 8 वाजून 37 मिनिटांचा आहे. या काळात म्हणजे प्रदोषकाळात त्रयोदशी आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि कोकणामध्ये 22 ऑक्टोबरला धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे.
महाराष्ट्रात जेथे सूर्यास्ताची वेळ 6 वाजून 3 मिनिटांपूर्वीची आहे तेथे म्हणजे सोलापूर, नागपूर, अकोला, अमरावती, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद या ठिकाणी 23 ऑक्टोबरला धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे.
धनत्रयोदशी दिवशी धन्वतरीची पूजा केली जाते. तसेच धन संपत्तीची पूजा करताना माता लक्ष्मी आणि कुबेराची देखील पूजा करून घरात पैशांची बरसात होत रहावी यासाठी प्रार्थना केली जाते.
– नंदिनी जी.