बेळगाव : कर्नाटक विधानसभेत बेळगावात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या पोर्टेटचे अनावरण आज करण्यात आले. मात्र या पोर्ट्रेटमुळे काँग्रेसची पोटदुखी झाली आहे.
बेळगाव कर्नाटकची उपराजधानी आहे, तेथे कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनात आज विधानसभा सभागृहात अन्य देशभक्तांबरोबरच सावरकरांच्या पोर्ट्रेटचे अनावरण करण्यात आले. मात्र त्यावेळी काँग्रेसच्या आमदारांनी सभागृहाबाहेर पंडित जवाहरलाल नेहरू आणि अन्य अन्य काँग्रेस नेत्यांचे फोटो – फलक हातात घेऊन आंदोलन केले.
या आंदोलनासंदर्भात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या म्हणाले, की कोणत्याही नेत्याच्या पोर्ट्रेटला काँग्रेसचा विरोध नाही. आम्ही आंदोलन केलेले नाही. पण विधानसभेत सर्व देशभक्तांची पोर्टेट लावावी, अशी आमची मागणी आहे. कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांनी एकतर्फी निर्णय घेऊन सावरकरांचे पोर्ट्रेट विधानसभेत लावले आहे.
काँग्रेसच्या या विरोधावर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. देशात वैचारिक मतभेद असू शकतात. पण वीर सावरकर महान स्वातंत्र्य सेनानी होते. स्वातंत्र्य संग्रामात त्यांचे योगदान नाकारता येणार नाही. कर्नाटक विधानसभेत सावरकरांचे पोर्टेट लावायचे नाही? तर काय सिद्धरामय्यांना विचारून दाऊद इब्राहिमचे पोर्ट्रेट लावायचे??, असा खोचक सवाल प्रल्हाद जोशी यांनी केला आहे. काँग्रेसने कायम मुसलमानांच्या तुष्टीकरणाचे राजकारण केले याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.