Paris Olympics 2024 Men’s Hockey Bronze Medal Match: भारताच्या हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकत यंदाच्या ऑलिम्पिकमधील भारताला चौथ पदक मिळवून दिलं आहे. भारताने कांस्यपदकाच्या सामन्यात स्पेनचा २-१ अशा फरकाने पराभव करत १४ वं ऑलिम्पिक पदक हॉकी संघाने पटकावलं आहे. या विजयासह पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने इतिहास घडवला आहे. संघाने सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक जिंकले आहे. याआधी त्यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्येही कांस्यपदक जिंकले होते. भारतीय हॉकी संघाच्या इतिहासात ही दुसरी वेळ आहे, जेव्हा भारताने सलग दोनदा ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे.
यापूर्वी १९६८ आणि १९७२ च्या ऑलिम्पिकमध्येही भारताने कांस्यपदक जिंकले होते. भारताचा गोलकिपर म्हणजेच भारतीय हॉकी संघाची भिंत म्हटल्या जाणाऱ्या श्रीजेशचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता, कांस्यपदकाला गवसणी घालत श्रीजेशच्या कारकीर्दीचा गोड शेवट झाला आहे.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा कांस्यपदकासाठी भारत वि स्पेन यांच्यात हॉकी सामना खेळवला गेला. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी गोल करण्याचा प्रयत्न केला. पण कोणताच संघ गोल करू शकला नाही. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये स्पेनला पेनल्टी मिळाली आणि त्यांनी गोल करत आघाडी मिळवली. यानंतर ३०व्या मिनिटाला भारताला पेनल्टी मिळाली आणि यानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंगने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. पण स्पेन गोल करण्यात अपयशी ठरला. यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्येही भारताकडून हरमनप्रीतने पेनल्टीवर गोल केला. यासह भारताने २-१ अशी आघाडी मिळवली.
भारत आणि स्पेनच्या संघांनी आतापर्यंत चांगली कामगिरी करत उपांत्य फेरी गाठण्यात यश मिळवले. मात्र, दोन्ही संघांना आपापल्या उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघाला जर्मनीविरुद्ध किरकोळ पराभवाला सामोरे जावे लागले, तर स्पॅनिश संघाने नेदरलँडविरुद्ध जवळपास एकतर्फी सामना गमावला. भारतीय हॉकी संघाने यापूर्वी २०२० मध्ये टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. त्यावर्षीही भारताने शानदार खेळ केला आणि उपांत्य फेरी गाठली, पण तिथेही सुवर्ण आणि रौप्यपदकांच्या शर्यतीपूर्वी एक सामना गमावला. यानंतर भारत आणि जर्मनी यांच्यात कांस्यपदकाची लढत झाली, त्यात भारतीय हॉकी संघाने सामना जिंकून कांस्यपदक पटकावले