भारतातल्या हरित क्रांतीचे जनक : एम.एस स्वामिनाथन :
काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी स्वातंत्र्यानंतरच्या काळातली मोठी हरितक्रांती घडवून आणणाऱ्या एम.एस स्वामिनाथन ह्यांचे निधन झाले. कमी उत्पन्न असलेल्या शेतकर्यांना अधिक उत्पादन देण्यास मदत होईल अश्या धान्याच्या उच्च-उत्पादक जाती विकसित करण्यात स्वामिनाथन यांचा मोठा वाटा होता.
तामिळनाडूत १९२५साली जन्मलेले स्वामिनाथन, हे सुरुवातीला डॉक्टरीचे शिक्षण घेत होते. पण १९४३साली बंगालात पडलेल्या दुष्काळामुळे त्यांनी शेती ह्या विषयाकडे वळण्याचा निर्णय घेतला. पुढे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पास झाल्यावर त्यांना पोलीस अधिकारी बनण्याची संधी होती पण त्यांनी ती नाकारली आणि शेतीमधल्या प्रयोगात स्वतःला झोकून दिले.
भारतीय गरीब शेतकऱ्यांच्या शेतात गव्हाचे आणि तांदळाचे उच्च उत्पन्न देणारे वाण पेरुन त्यांनी हरितक्रांती घडवून आणली. या प्रयत्नांमुळेच गहू आणि तांदूळ यांच्या उत्पादनांत भारत स्वयंपूर्ण होऊ झाला आणि मोठा निर्यातदार बनला.
कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल एम.एस. स्वामीनाथन ह्यांना भारत सरकारकडून पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आदी पद्म पुरस्कार तर जैविक शास्त्रासाठी त्यांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार मिळाला आहे. तसेच रॅमन मॅगसेसे पुरस्कार, World food prize 1987 असा पुरस्कारांनी सुद्धा सन्मान करण्यात आला आहे.