Pune MPSC Student Protest : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेमध्ये कृषी विभागाच्या २५८ पदांचा समावेश करण्याच्या मागणीसाठी स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्रीपासून पुण्यातील शास्त्री रोड या ठिकाणी आंदोलन सुरु केलं होतं. तसेच नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली असून २५ तारखेची परीक्षा पुढे ढकण्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपली परीक्षा पुढे ढकलून त्यामध्ये २५८ कृषी पदांचा समावेश करावा, अशी मागणी या आंदोलक विद्यार्थ्यांची होती.
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची आणि आयबीपीएसची परीक्षाही एकाच दिवशी येत असल्यामुळे विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावं लागणार असल्यामुळे विद्यार्थ्यांकडून २५ तारखेची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने त्यांच्या मागणीची दखल घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर (ट्विटर) यासंदर्भात माहिती देत विद्यार्थ्यांच्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना केली असल्याचं म्हटलं आहे.
स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्रीपासून पुण्यात आंदोलन सुरु केलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेमध्ये कृषी विभागाच्या २५८ पदांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच आयबीपीएसची परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही २५ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्या आहेत.
त्यामुळे आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी आहे. याबाबत आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विद्यार्थ्यांच्या मागणीबाबत बैठक घेत सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे दिली होती, तरी त्यांनी सांगितल्या प्रमाणे त्यांचे आश्वासन पूर्ण करत आयोगानेही विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत.
दरम्यान, आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल.