मुंबई : राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी ५ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला होता. या निकालात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला मोठे यश मिळाल्यानंतर देखील राज्यात सरकार स्थापनेचा दावा करण्यात आला नव्हता. गेल्या काही दिवसांपासून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मंत्रिमंडळाबाबत चर्चा सुरू आहे.
राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार याबाबत बोलताना राहुल नार्वेकर यांनी देखील वक्तव्य केले आहे. पाच तारखेच्या सुमारास शपथविधी होऊन सरकार स्थापन होईल, असे ते म्हणाले. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या सरकारचा शपथविधी ५ तारखेला दुपारी १ वाजता आझाद मैदानावर होणार आहे. अर्थात याबाबत भाजपकडून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.
त्याआधी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक 3 तारखेला दुपारी 1 वाजता होणार आहे. या बैठकीत विधिमंडळातील नेत्याची निवड केली जाणार आहे. आमदारांच्या या बैठकीसाठी नवी दिल्लीतून निरीक्षक येणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अन्य राज्यातील काही मुख्यमंत्री तसेच एनडीएमधील महत्त्वाचे नेते उपस्थित राहू शकतात. राज्यातील विधानसभा निवडणुकीत 288 पैकी महायुतीला 235 जागा मिळाल्या आहेत. भाजपने सर्वाधिक 132 जागांवर विजय मिळवला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने 57 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 41जागांवर बाजी मारली होती.
परंतु ,भाजपकडून अद्याप मुख्यमंत्री पदासाठीच्या नावाची घोषणा झालेली नाही. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असले तरी त्याबाबत आमदारांच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल. याआधी 2014 साली जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते त्यांनी वानखेडे मैदानावर शपथ घेतली होती. तर 2019 साली त्यांनी राजभवनात शपथ घेतली होती. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदे यांनी माघार घेतली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाकडून या पदासाठी दावा करण्यात आलेला नाही.