बेळगाव : दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी धर्मवीर संभाजीराजे सुशोभीकरण समितीच्या वतीने छत्रपती शंभूराजांचा 344 वा राज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाजपा राज्य उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल बेनके होते. पारंपारिक वेशभूषा करून हा सोहळा साजरा करण्यात आला.
धर्मवीर संभाजी चौकात गुरुवारी सकाळी 6 वाजता माजी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज मूर्ती दुर्गाभिषेक घालून विधिपूर्वक पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी बोलताना माजी आमदार अनिल बेनके म्हणाले की, शूरवीर संभाजीराजे यांना वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्राहून सुटकेचा थरार अनुभवायला मिळाला. संस्कृत भाषेवर त्यांचे प्राभुत्व होते. वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी ‘बुधभूषण’ ग्रंथ लिहिला होता. केशव भट व उमाजी पंडितांच्या तालमीत त्यांचे शिक्षण झाले. परकीय लेखकाने त्यांच्या युद्धनीतीची वाहवा केली असे माझी आमदारांनी सांगितले.
यावेळी धर्मवीर संभाजी राजे सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधव, सेक्रेटरी प्रसाद मोरे, श्रीनाथ पवार, निशा खुडे, नगरसेवक शंकर पाटील, जयतीर्थ सवदत्ती या सह शंभू भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.