शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर आता निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला नवीन चिन्ह जाहीर केलं आहे. उद्धव ठाकरे यांना मशाल (Torch) हे चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे आता अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांना मशाल (Torch) या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. त्याबरोबरचं ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) असे नावही देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे 3 चिन्हांच्या पर्यायाचा प्रस्ताव दिला होता. ज्यामध्ये उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूल या पर्यायांचा समावेश होता.
उद्धव ठाकरे यांनी काल फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला होता. यावेळी त्यांनी म्हटले होते की, ‘आम्ही त्रिशूल, उगवता सूर्य आणि मशाल ही तीन चिन्हे सादर केली आहेत. पक्षाच्या नावांसाठी आम्ही शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे) किंवा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ही तीन नावे सुचवली आहेत.’
उगवता सूर्य हे चिन्ह तामिळनाडू मधील एका पक्षाला आधीच दिलं गेलं असल्याने ते चिन्ह देता आलं नाही. तर त्रिशूल हे धार्मिक चिन्ह असल्याने ते देखील देता येणार नव्हतं. म्हणून निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मशाल हे चिन्ह दिलं आहे.
एकनाश शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून चिन्हाबाबत 3 पर्यांय देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर शिंदे गटाला चिन्ह जाहीर केलं जाणार आहे. तसेच शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव निवडणूक आयोगाने दिले आहे. शिंदे गटाकडून देखील उगवता सूर्य हे चिन्ह मागण्यात आलं होतं; परंतु उगवता सूर्य चिन्ह दोघांनाही ही मिळाले नाही. मात्र अद्यापही शिंदे गटाने चिन्हाबाबत पर्याय दिले नाहीत. शिंदे गटाला उद्या सकाळी 10 पर्यंत चिन्हासाठी 3 पर्याय देण्यासाठी सांगण्यात आले आहे. आता बघूया उद्या शिंदे गटाकडून कोणते 3 पर्यायी चिन्ह दिले जातात आणि कोणते चिन्ह निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला दिले जाते.