बेळगाव : महाराष्ट्राच्या सीमेनजीक कर्नाटक हद्दीत अत्यंत खराब झालेल्या बेळगाव -वेंगुर्ला रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील संतप्त वाहन चालक आणि नागरिकांनी आज सकाळी कर्नाटक -महाराष्ट्र सीमेवरील शिनोळी जवळ भव्य रास्ता रोको आंदोलन करून रस्ता चक्क जाम केला होता.
बेळगाव -वेंगुर्ला या रस्त्याची महाराष्ट्र सीमेजवळ कर्नाटक हद्दीत खड्डे पडून वाताहत झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावर वारंवार लहान-मोठे अपघात घडत असून सदर रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वारंवार तक्रार करून देखील बेळगाव -वेंगुर्ला रस्त्याच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. अलीकडेच त्रस्त वाहन चालक आणि नागरिकांनी या रस्त्याची 22 ऑगस्टपूर्वी दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा 23 ऑगस्टला रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल असा इशाराही दिला होता.
मात्र त्याकडे देखील कर्नाटक सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्यामुळे संतप्त वाहनचालक व नागरिकांनी आज शुक्रवारी 23 ऑगस्ट रोजी सकाळी शिनोळी जवळ बेळगाव -वेंगुर्ला रस्ता अडवला. मोठ्या संख्येने जमलेल्या आंदोलनकर्त्यांनी ट्रक आडवा उभा करण्याबरोबरच रस्त्यावर ठिय्या मारून रास्ता रोको सुरू केला. ‘रस्ता आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा’ या घोषणेसह कर्नाटक सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सुरू झालेल्या या रस्ता रोकोमुळे सदर मार्गावरील वाहतूक कांही तास ठप्प झाली होती. चक्काजाम झाल्यामुळे शिनोळी जवळ बेळगाव -वेंगुर्ला रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
याप्रसंगी बोलताना आंदोलनाचे नेते म्हणाले की, मिळालेल्या माहितीनुसार मागील वर्षीच हा रस्ता करण्यात आला होता. एखाद्या रस्त्याची वारंवार दुरुस्ती करावी लागत असेल तर त्याला काय अर्थ आहे. चांगले दर्जेदार रस्ते सार्वजनिक बांधकाम खात्याला तयार करता येत नाहीत का? खराब झालेल्या या बेळगाव -वेंगुर्ला रस्त्यामुळे काही दिवसांपूर्वी एक गर्भवती महिला अकाली प्रसुत झाली. त्यावेळी तिला जी इजा झाली जो अवास्तव वैद्यकीय खर्च आला त्याला जबाबदार कोण? कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम खाते अत्यंत मुर्दाड आहे.
आज आम्ही रस्त्यावर बसलो आहोत उद्या तुमच्या कार्यालयामध्ये येऊन बसण्यास मागेपुढे पाहणार नाही. या रस्त्यावर एखाद्याचा जीव गेला तर त्याला जबाबदार कर्नाटक सरकार राहील. खरंतर रस्ता व्यवस्थित राहील याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याची आहे. त्यांनी कंत्राटदाराकडून ते काम योग्य रीतीने करून घेतले पाहिजे. एकेकाळी कर्नाटकातील रस्ते फार सुंदर असतात असे आम्ही सांगत होतो मात्र आता परिस्थिती उलट झाली आहे.
आज महाराष्ट्रातील रस्ते कर्नाटकातील रस्त्यांपेक्षा कितीतरी पटीने चांगले आहेत. आमच बेळगावशी आणि या रस्त्याशी असलेल नातं खूप जुनं मोठ आहे. कर्नाटक सरकार अथवा बेळगाव प्रशासनाने असे समजण्याची गरज नाही की महाराष्ट्रातील लोक आमच्या हद्दीतील रस्त्यासाठी का आंदोलन करत आहेत? तर मी सांगू इच्छितो की हा संविधानाने आम्हाला दिलेला नागरी हक्क आहे, आंदोलनकर्त्या नेत्यांनी स्पष्ट केले.