बेळगाव : सध्या संपूर्ण बेळगावभारत श्री दुर्गामाता दौड सुरु आहे. सकाळच्या वेळेत गल्लोगल्ली घोषणांच्या आवाजाने वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
देव, देश आणि धर्म रक्षणाच्या उद्देशाने, तरुणांना संघटित करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या दुर्गामाता दौडमध्ये यंदा अनेक ठिकाणी, विशेषतः ग्रामीण भागात समाजाभिमुख संदेश देत जनजागृती करण्याचे कार्य होत आहे. आज बेळगाव तालुक्यातील पिरनवाडी येथे सहाव्या दिवसाची दौड पार पडली.
यावेळी आबालवृद्धांनी उत्साहाने या दौडमध्ये सहभाग घेतला. यादरम्यान दौड मार्गावर चिमुकल्यांसह प्रत्येक पिढीतील नागरिकाने सीमाप्रश्न, मराठी भाषा, संस्कृती वर आधारित अनेक फलक हातात घेत जनजागृती केली.
पिरनवाडी येथे आयोजित या दौडच्या माध्यमातून सीमाभागातील प्रत्येक कानाकोपऱ्यात वसलेल्या मराठी भाषिकांची मराठी भाषेविषयीची तळमळ पुन्हा एकदा प्रकट झाली आहे. केंद्र सरकारने नुकतेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाही दिला आहे .
यानंतर अनेक मराठी भाषिकांनी याविषयीही जनजागृती केली. काहींना कानपिचक्या दिल्या. आपली संस्कृती आणि आपली भाषा जतन करण्यासाठी आणि संवर्धन करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, मराठी भाषिक म्हणून आपली भूमिका आणि कर्तव्ये कशी पार पाडली पाहिजेत, यावर आता नवी पिढी उतरली असून याचा प्रत्यय आज पिरनवाडी भागात आयोजिण्यात आलेल्या श्री दुर्गा माता दौड च्या निमित्ताने आला.