केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शनिवारी मोठा निर्णय घेत शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं. त्याशिवाय शिवसेना हे पक्षाचे नावही वापरण्यास ठाकरे गट आणि शिंदे गटाला मनाई करण्यात आली आहे.
दरम्यान हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपाचा असल्याची माहिती आहे. केवळ अंधेरी पोटनिवडणुकीकरता हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत नव्या चिन्हासाठी दावा करण्याचे निर्देशही आयोगाकडून देण्यात आले आहेत. शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून पुढील संघर्षास सज्ज असल्याचे सांगितले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत जिंकून दाखवणारच असे म्हटले आहे. इन्स्टाग्रामवर केलेल्या या पोस्टला शिवसैनिकांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. पुढील संघर्षासाठी आम्ही तयार असल्याचेही शिवसैनिकांनी म्हटले आहे. शिवसेना ही संघर्षातून तयार झाली असून आतादेखील संघर्षातून ती पुढे जाणार असल्याचे शिवसैनिकांनी म्हटले.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना नेते, शिवसैनिकांमध्ये प्रतिक्रिया उमटू लागली. त्याचे पडसाद सोशल मीडियावरही दिसले. आमचे चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे असे म्हणत शिवसैनिकांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत.
आदित्य ठाकरे यांची संतप्त प्रतिक्रिया
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा जो नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे ; महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. ‘ लढणार आणि जिंकणारच! आम्ही सत्याच्या बाजूने! सत्यमेव जयते! असे ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केले.