सातारा : देशात भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नागरिकांची मुस्कटदाबी सुरू केली आहे. भविष्यात हुकुमशाही आणण्याचा त्याचा प्रयत्न असून त्यांच्याबद्दल बोलणारांविरोधात केंद्रीय एजन्सींचा वापर केला जात आहे. अजित पवार समर्थकांसह भाजप सरकारमध्ये सहभागी झाले असले, तरी शरद पवार राजकारण सोडतील, पण भाजपमध्ये अजिबात जाणार नाहीत, असे स्पष्ट मत भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष, उपराकार लक्ष्मण माने यांनी सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील आमदारांचा मोठा गट फोडल्यामुळे पक्ष खिळखिळा झाला आहे. शरद पवार भाजपसोबत हातमिळवणी करणार का, अशा शंका अधुमधून उपस्थित केल्या जात असताना लक्ष्मण माने यांनी सातारा परिषदेत मत सांगितले.
राज्यात झालेले सत्तानाट्य हे भाजपचे यश नसून केंद्रीय यंत्रणांचे यश आहे. या यंत्रणांचा वापर करून पक्ष फोडाफोडीचे काम सुरू असून हे लोकशाहीसाठी घातक आहे. माझ्यावर कोणतीही कारवाई करा, मी घाबरणार नसून चुकीच्या गोष्टींबद्दल आपण बोलणार आहे. मी साहित्यिक असून मला सत्य बोलले पाहिजे. राज्यातील सर्व साहित्यिकांनी सत्य बोलून मुस्कटदाबीविरोधात आवाज उठवला पाहिजे. भाजप सोडून कोणालाही मत द्या, असे आवाहन करत भाजपविरोधी पक्ष व संघटनांनी एकत्र यावे, असे आवाहन माने यांनी केले.