Ad imageAd image

लाडकी बहीण योजनेचा मतदारांवर किती परिणाम होईल? शरद पवारांचा प्रश्न; म्हणाले…

ratnakar
लाडकी बहीण योजनेचा मतदारांवर किती परिणाम होईल? शरद पवारांचा प्रश्न; म्हणाले…
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शरद पवार : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. सरकारकडून पात्र महिलांना थेट खात्यात दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला जमा केले जात आहेत. निवडणुकांनंतर ही रक्कम २१०० करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं असताना दुसरीकडे विरोधकांकडून जिंकून आल्यास ही रक्कम थेट ३००० केली जाईल, असं सांगण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही योजना सुरू केल्याचीही चर्चा होत आहे. त्यावर आता शरद पवारांनी भाष्य केलं असून या योजनेचा मतदारांवर नेमका किती परिणाम होईल? यावर त्यांनी भूमिका मांडली आहे.

लोकसभा निवडणूक निकालांवर भाष्य
शऱद पवारांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात वेगळं वातावरण दिसत होतं, असं म्हटलं आहे. “मी गेले काही दिवस महाराष्ट्रात फिरतोय. विदर्भापासून आम्ही सुरुवात केली. तिथून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र अशा ठिकाणी मी फिरलो. अनेक सभा घेतल्या. मला असं दिसतंय की लोकसभा निवडणुकीत लोक शांत होते. त्यांचं मत सांगत नव्हते. एक प्रकारची वेगळी स्थिती होती. पण आलेला निकाल वेगळा होता. त्यापूर्वी पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला राज्यात १ जागा मिळाली होती आणि आम्हाला ४ जागा होत्या. ६ महिन्यांपूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत आम्ही एकदम ३० वर गेलो. याचा अर्थ लोकांना मोदींची भूमिका पसंत नसावी असं जनमत राज्यात दिसलं”, असं शरद पवार म्हणाले.

“साताऱ्यात चिन्हाची गडबड झाली नसती तर इथेही वेगळा निकाल लागला असता. पण गेल्या निवडणुकीतील मतदान पाहता एकंदर एरवी न रिअॅक्ट होणारा आणि मतदानाच्या दिवशी रिअॅक्ट होणारा कौल पाहायला मिळाला”, असं विश्लेषण शरद पवारांनी यावेळी मांडलं.

“लोकसभेची सत्ताधाऱ्यांनी गांभीर्यानं दखल घेतली”
दरम्यान, लोकसभा निकालांची सत्ताधाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन लोकांना खूश करणाऱ्या योजना जाहीर केल्या, अशी टीका शरद पवारांनी यावेली केली. “आत्ताच्या निवडणुकीत वेगळी स्थिती आहे. सत्ताधारी पक्षाला लोकसभा निवडणुकीच्या बसलेल्या फटक्याची नोंद त्यांनी गांभीर्याने घेतली. म्हणजे काय केलं तर लोकांना खूश करण्यासाठीच्या योजना जाहीर केल्या. जास्तीत जास्त पैसे उचलले, जेणेकरून लोकांना समाधानी ठेवता येईल. याची उपयोगिता किती आहे? हे किती दिवस टिकणार आहे? हे पाहाता आज वेळ मारून न्यायची आणि निवडणुका जिंकायच्या असं त्यांचं धोरण दिसतंय”, अशा शब्दांत शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे.

लाडकी बहीण योजनेचा किती परिणाम?
लाडकी बहीण योजनेचा मतदारांवर परिणाम होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यासंदर्भात शरद पवारांनी भाष्य केलं. “माझी अशी माहिती आहे की लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास २ कोटी ३० लाख महिलांना त्यांनी १५०० रुपये दिले. त्यातून महिलांना आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. त्यांनी एवढे पैसे वाटले याचा काही ना काही परिणाम होईल, पण फार परिणाम होईल असं मला वाटत नाही”, असा दावा शरद पवारांनी केला.

परिणाम होणार की नाही?
दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा फारसा परिणाम का होणार नाही? यावरही पवारांनी भाष्य केलं. “एका बाजूने तुम्ही मदत केली आणि दुसरीकडे राज्यात महिलांवरच्या अत्याचारांमध्ये वाढ झाल्याचं दिसत आहे. आकडेवारीनुसार २ वर्षांत राज्यात ६७ हजार ३८१ महिला अत्याचाराच्या तक्रारी आहेत. हा आकडा लहान नाही. महिला व मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण ६४ हजार आहे. गृहमंत्री ज्या जिल्ह्याचे आहेत, त्या जिल्ह्यातही ही स्थिती आहे. एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे महिलांवर अत्याचार होतात, त्या बेपत्ता होतात. याचा काही ना काही परिणाम होईल ना? आम्ही लोकांसमोर दुसरी बाजू मांडत आहोत”, असं शरद पवार म्हणाले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article