बेळगाव : बँक ऑफ इंडिया ते जुना पी. बी. रोडपर्यंत रस्ता रुंदीकरणामागे राजकारण आहे. आयुक्त आणि सरकारला त्रास देण्यासाठी आताही प्रयत्न होत आहेत. कुणाच्या चुकीला दुसरा बळी पडू नये, यासाठी आम्ही मालकांना जागा परत देण्याचा निर्णय घेतला आहे असे वक्तव्य बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी सुवर्णसौध येथे केलं आहे.
सध्या बेळगाव महापालिकेने रस्ता केलेली जमीन मूळ मालकांना परत देण्याचा निर्णय घेतला आहे त्यावर पत्रकारांनी त्यांना छेडले असता त्यांनी असं वक्तव्य केलंय.
मंत्री जारकिहोळी म्हणाले, महापालिकेकडे केवळ 40 कोटी आहेत. त्यामधून भरपाई म्हणून 20 नव्हे 27 कोटी देता येत नाहीत. वेतन, विकास कामांना निधी राहणार नाही. त्यामुळे आम्ही मालकांना जागा परत करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने सांगितले तर मालकांनाही मान्य करावेच लागते. रस्ता एनए नाही. त्यामुळे राजकारण करून रस्ता करण्यात आला. त्यावेळी करण्यात आलेल्या चुकांमुळे आताच्या अधिकार्यांचा बळी जावू नये, यासाठी आम्ही निर्णय घेतला आहे. सर्वसाधारण सभेत भरपाईबाबत आयुक्तांनी निर्णय घ्यावा, असा ठराव करण्यात आला. असा ठराव करण्याचा महापालिकेला अधिकार नाही. त्यामुळे आता आयुक्तांशी चर्चा करून या विषयातून मार्ग काढण्यात येत आहे.
मुळात हा विषय नितेश पाटील जिल्हाधिकारी असतानाचा आहे. त्यांना न कळवताच महापालिकेने सरकारला रस्त्याची भरपाई देण्याबाबत कळवले आहे. पण आता आम्ही हे मान्य करणार नाही. कुणाची तरी चूक आणि कुणाला तरी शिक्षा असा प्रकार होवू नये, यासाठी जागा मालकांना जागा परत देवून हा विषय संपवण्यात येणार आहे. जागा परत दिल्यामुळे आभाळ कोसळत नाही. सीडीपीनुसार हा रस्ता 45 फुटांचा आहे. पुढे हा रस्ता महापालिकेकडेच येणार आहे. पण, त्यासाठी योग्य प्रकारे भविष्यात रस्ता करण्यात येणार आहे, असेही मंत्री सतीश जारकिहोळी यांनी सांगितले.
आम्ही आयुक्ताच्या पाठीशी थांबू:
सर्वसाधारण सभेत आयुक्तांनी निर्णय घ्यावा, असे ठरवण्यात आले. आयुक्तांना त्रास देण्यासाठी असा निर्णय घेतला तरी आयुक्त हुशार आहेत. ते यामध्ये सापडत नाहीत. आम्ही त्यांच्या पाठीशी थांबणार आहे, असे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी सांगितले.