संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस हा तुकाराम बीज म्हणून सोहळ्यासारखा साजरा केला जातो. यंदा २० मार्च रोजी तुकाराम बीज साजरी होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या निर्बंधनामुळे तुकाराम बीज सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला होता. पण यंदा कोरोनाचे नियम शिथील केल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक संतनगरी देहूत दाखल होतील.
या दिवशी तुकाराम महाराजांचे भाविक संतश्रेष्ठाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते. हा दिवस ‘तुकाराम बीज’ म्हणून ओळखला जातो. संत तुकाराम महाराज हे संसारी असून सुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थाकडे वळवले. संत तुकाराम हे सतराव्या शतकातील एक वारकरी संत, कवी होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला देहू गावात झाला. पंढरपूरचे विठ्ठू माऊली हे तुकारामांचे आराध्य दैवत होते. तुकारामांना वारकरी ‘जगद्गुरु ‘ म्हणून ओळखले जाते.
जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा!!
अशा प्रकारच्या अभंग रचना संत तुकाराम महाराजांनी रचल्या आणि यातून जनसामान्यांना ईश्वर भक्तीचा मार्ग दाखवला. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो.
तुकाराम महाराज हे वास्तववादी निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत म्हणून ओळखले जातात. संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून आणि कीर्तनांतून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे काम केले.
भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी..!
असा उपदेश करणाऱ्या तुकाराम महाराजांच्या रचना आजच्या काळातही तितक्या समर्पक आहेत.