रत्नागिरी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस बरसतो आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी जास्त प्रमाणात पाऊस सुरू आहे. मात्र, आता सातत्याने होत असलेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यामुळे अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती ओढावली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.
कोकणातही गेले काही दिवस जोरदार पाऊस सुरू आहे. रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. अनेक रस्ते, पूल पाण्याखाली गेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून रत्नागिरी व रायगडमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसाने काही जिल्ह्यांना चांगलंच झोडपून काढलं आहे. तर काही जिल्ह्यांत अजूनही चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात येत्या काही दिवसात दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
राज्यावर पुढचे २-३ तास अस्मानी संकट, कोल्हापूरसह १० भागांमध्ये अतिवृष्टीचा अलर्ट जारी केला आहे.
दरम्यान, आता आयएमडी अर्थात भारतीय हवामान विभागाने राज्यातील ४ जिल्ह्यांना आज (२६ जुलै) रेड अलर्ट दिला आहे. तसेच उर्वरित जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्टही दिला गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नका आणि सुरक्षित स्थळी थांबा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
या ४ जिल्ह्यांना रेड अलर्ट
आयएमडीनुसार, कोकणातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येकी २ अशा एकूण ४ जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला गेला आहे. त्यामुळे या ४ जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई, ठाणे, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे.