Ad imageAd image

रमेश कत्ती यांचा डीसीसी बँकेला ‘राम राम’

ratnakar
रमेश कत्ती यांचा डीसीसी बँकेला ‘राम राम’
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : डीसीसी बँकेच्या राजकारणाची चर्चा बेळगावमध्ये सुरु असतानाच माजी खासदार रमेश कत्ती यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. डीसीसी बँकेत अंतर्गत राजकारण सुरु असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकू येत असतानाच अचानकपणे दिलेल्या राजीनाम्यामुळे पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.
रमेश कत्ती यांच्या विरोधात डीसीसी बँकेचे 14 संचालक नाराज होते. त्यांनी बैठकीला अनुपस्थिती दर्शविली होती. नाराज संचालकांची स्वतंत्र बैठक झाल्यानंतर रमेश कत्ती यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा निर्णय झाला होता.

मात्र यादरम्यान कत्तींनीच अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अविश्वास ठरावाची संवेदनशीलता लक्षात घेऊन रमेश कत्ती यांनी राजीनामा दिल्याचेही बोलले जात आहे.

या घटनेनंतर बेळगावी डीसीसी बँकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झालेली दिसून येत आहे. माजी खासदार रमेश कत्ती आणि अण्णासाहेब जोल्ले यांच्यात सुरु असलेल्या मतभेदामुळे हि परिस्थिती ओढवेल याची आधीपासूनच शंका उपस्थित केली जात होती. मात्र कत्ती यांनी राजीनामा दिल्याने या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.

रमेश कत्ती हे बीडीसीसी बँकेचे अध्यक्ष म्हणून तर अण्णासाहेब जोल्ले हे या बँकेचे संचालक म्हणून काम पाहात आहेत. बेळगाव डीसीसी बँकेच्या सर्वसाधारण सभेवर अण्णासाहेब जोल्ले गटाने स्वतंत्र सभा घेऊन रमेश कत्ती यांच्या विरोधात संताप व्यक्त केला असून उपाध्यक्षांसह अनेक संचालकांनाही आपल्या बाजूने वळवले आहे.

रमेश जारकीहोळी आणि भालचंद्र जारकीहोळी यांनी बैठकीला उपस्थित राहून त्यांना पाठिंबा दर्शविला. मात्र निवडणुकीला एक वर्षाचा कालावधी शिल्लक असताना अचानकपणे अशापद्धतीने दिलेल्या राजीनाम्यामुळे डीसीसी बँकेच्या अध्यक्षपदाविषयी नव्या चर्चांना ऊत आला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article