नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना देण्यात आलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे काँग्रेसमध्ये देशभरात उत्साहाचे वारे संचारले आहे. आधीच भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेस केडर चार्ज झाले आहे. त्यात आता राहुल गांधी संसदेत पुन्हा दिसणार असल्याने काँग्रेसच्या आनंदात आणखीनच भर पडली आहे.
मोदी आडनाव बदनामी प्रकरणात गेलेली खासदारकी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुन्हा मिळाली आहे. सूरत न्यायालयाच्या २ वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आज सोमवारी सकाळी लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल केली आहे. त्यामुळे मणिपूर हिंसाचारावर लोकसभेत होणाऱ्या चर्चेवेळी आणि अविश्वास ठरावाच्या चर्चेत राहुल गांधी सहभागी होऊन केंद्र सरकारवर टीकेचे कठोर आसूड ओढतील हे नक्की आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘मोदी’ आडनावावरुन २०१९ साली टिप्पणी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उद्योगपती विजय माल्या, नीरव मोदी तसेच ललित मोदी अशा कर्जबुडव्यांचा उल्लेख करत ‘सर्व चोर मोदीच का असतात?’ असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. कर्नाटक निवडणुकीच्या रॅलीत केलेल्या या वक्तव्यानंतर गुजरातमधील भाजपाचे आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवून दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या शिक्षेविरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सूरत न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती दिली. सुरत न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर २४ तासांत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालास ७२ तास उलटल्यानंतरही त्यांना खासदारकी मिळाली नव्हती. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांच्या मनात काही वेगळं सुरू आहे का? अशा चर्चा देशभरात सुरू होत्या. तरी लोकसभा सचिवालयाने अधिसूचना काढून राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल केली आहे.
सध्या लोकसभेत केंद्र सरकारच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आहे. तो निश्चितच नामंजूर होणार असला तरी मणिपूर हिंसाचारावर सविस्तर चर्चा व्हावी आणि तिला पंतप्रधानांनी उत्तर द्यावे, असा या ठरावाचा प्रस्ताव देण्यामागचा खरा हेतू आहे. राहुल गांधी हे लोकसभेत परत आल्याने ते निश्चितच या प्रस्तावावर आक्रमक भाषण करतील. राजकीय स्थान आणखी बळकट करण्यासाठी ती महत्त्वाची संधी असेल.
काँग्रेसमध्ये आनंदीआनंद!
सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना देण्यात आलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे काँग्रेसमध्ये देशभरात जे उत्साहाचे वारे संचारले आहे. आधीच भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेस केडर चार्ज झाले आहे. त्यात आता राहुल गांधी संसदेत पुन्हा दिसणार असल्याने काँग्रेसच्या आनंदात आणखीनच भर पडली आहे.