Kangana Ranaut Invites Priyanka Gandhi: भाजपाच्या नेत्या, लोकसभेच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांचा आणीबाणीवरील आधारित ‘Emergency’ हा चित्रपट जानेवारी महिन्यात प्रदर्शित होत आहे. चित्रपटातील काही दृश्यावर आक्षेप घेतले गेल्यामुळे अनेक काळापासून चित्रपट रखडला होता. 1975 साली माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीवर सदर चित्रपट तयार केला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होताच कंगना रणौत यांचे एक विधान आता चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. काँग्रेसच्या नेत्या, खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनाही आपण सदर चित्रपट पाहण्याचे निमंत्रण दिले असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. या निमंत्रणानंतर प्रियांका गांधींनी काय उत्तर दिले, याचाही खुलासा त्यांनी केला.
कंगना रणौत काय म्हणाल्या?
पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये कंगना रणौत यांना विचारले गेले की, गांधी कुटुंबातील एखाद्या सदस्याने तुमच्याकडे ‘Emergency’ चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे का? यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, “नाही, गांधी कुटुंबातील कुणीही संपर्क साधला नाही. पण मी संसदेत प्रियांका गांधी यांना भेटले. त्यांनी माझ्या कामाचे आणि माझ्या केसांचे कौतुक केले. यावेळी त्यांच्याशी संभाषण सुरू असताना मी त्यांना ‘Emergency’ चित्रपट पाहण्याचे निमंत्रण दिले. यानंतर त्या म्हणाल्या की, ‘ठीक आहे, कदाचित’. मला वाटते, जे घडले ते जर त्यांनी स्वीकारलेले असेल तर त्यांना माझा चित्रपट नक्कीच आवडेल.”
1975 ते 1977 या काळात 21 महिन्यांसाठी देशात आणीबाणी लागू करण्यात आलेली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निर्णयानंतर आणीबाणी घोषित झाली होती. या काळातील घटनाक्रमावर ‘Emergency’ हा चित्रपट बेतलेला आहे. यात कंगना रणौत यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पात्र साकारले आहे.
इंदिरा गांधींबाबत रणौत काय म्हणाल्या?
कंगना रणौत पुढे म्हणाल्या, “प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी खास बाब असते. पण जेव्हा एखाद्या महिलेचा प्रश्न येतो, तेव्हा त्यांना त्यांच्या आसपास असणाऱ्या पुरुषांपेक्षा कमी लेखले जाते. वास्तवात अनेक वादग्रस्त घटना घडलेल्या आहेत. मी मात्र इंदिरा गांधींचे पात्र रंगवताना धीरगंभीरपणा आणि संवेदनशीलता कायम ठेवली आहे. त्यामुळेच प्रत्येकाने हा चित्रपट पाहावा, असे मला वाटते.”