Amruta Deshmukh Prasad Jawade :’बिग बॉस मराठी’ च्या (Bigg Boss Marathi) चौथ्या पर्वाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय जोडी अर्थात अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
अमृता आणि प्रसादने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. सोशल मीडियावर एका खास फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेने गपचूप साखरपुडा उरकला आहे. अमृता आणि प्रसादने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघेही रोमॅंटिक अंदाजात असून त्यांच्या हातात अंगठी पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये प्रसादने गुलाबी रंगाचा शर्ट परिधान केला असून अमृताने पांढऱ्या रंगाचा ट्रेडिशनल ड्रेस परिधान केला आहे.
ईस्टाग्राम वर फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शन लिहिलं आहे,”आम्ही साखरपुडा केला आहे. आम्ही दोघांनीही आयुष्यभर एकत्र एका टीममध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आता आमच्या मार्गात येणारे कोणतेही कार्य पार पाडण्यास आम्ही सज्ज आहोत”. ‘बिग बॉस स्टाईल कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अमृताने साखरपुड्याचे फोटो शेअर करताना त्यांच्या लग्नाची तारीखही जाहीर केली आहे. येत्या 18 नोव्हेंबरला अमृता आणि प्रसाद लग्नबंधनात अडकणार आहेत.
बिग बॉसच्या घरात झाली मैत्री अन्…
अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात सहभागी झाले होते. ‘बिग बॉस’च्या घरात त्यांची चांगली मैत्री झाली. या घरातील त्यांची भांडण आणि मिश्किल मैत्री चाहत्यांच्याही पसंतीस उतरली. बिग बॉसचा प्रवास संपल्यानंतरही त्यांची मैत्री आणखी वाढली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि आता त्यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. आजवर दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.
पुण्याच्या टॉकरवाडीने छोटा पडद्यावरही छाप पाडली….
अमृता देशमुख ‘पुण्याची टॉकरवाडी’ म्हणूनही ओळखली जाते. ‘तुमचं आमचं सेम असतं’ या मालिकेच्या माध्यमातून अमृताने मालिकाविश्वात पदार्पण केलं. फ्रेशर्स’, ‘देवा शप्पथ’, ‘मी तुझीच रे’, ‘आठशे खिडक्या नऊशे दार’ या मालिकांमध्ये अमृता महत्त्वाच्या भूमिकेत झळकली आहे. काही मराठी सिनेमांतही तिने काम केलं आहे. ‘बिग बॉस मराठी 4’च्या माध्यमातून अमृता देशमुख घराघरांत पोहोचली आहे.