बेळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त विधानावरून आज कर्नाटक विधानसभेच्या बेळगाव येथील हिवाळी अधिवेशनात जोरदार पोस्टर वॉर रंगले.
एकीकडे काँग्रेसच्या आमदारांनी डोक्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टर घेऊन नारेबाजी केली तर दुसरीकडे काँग्रेसविरोधात घोषणाबाजी करत डॉ. आंबेडकरांच्या विचारांविरोधात काँग्रेसची विचारसरणी असल्याचा आरोप भाजप आमदारांनी केला. यामुळे ‘जय भीम, जय आंबेडकर’ या घोषणांच्या आवाजाने कामकाजादरम्यान विधानसभा घुमत होती.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. याचे पडसाद आज कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी. अधिवेशनात उमटले. यावेळी सत्ताधारी काँग्रेस आमदारांनी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली.
गुरुवारी सकाळी काँग्रेस आमदारांनी अमित शहा यांच्या विरोधात निदर्शने करत काहींनी आपल्या जागेवर तर काहींनी व्यासपीठासमोर येऊन अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध केला. याविरोधात विरोधी पक्षातील भाजप आमदारांनी काँग्रेसविरोधात नारेबाजी करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसने दोन वेळा पराभव केल्याचे सांगितले.
भाजपनेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न बहाल केले. काँग्रेस स्वतः आंबेडकर विरोधी असल्याचे सांगतात जोरदार घोषणाबाजी केली. यादरम्यान निर्माण झालेल्या गोंधळामुळे सभापतींनी 10 मिनिटांसाठी अधिवेशनाचे कामकाज तहकूब केले.