Narendra Modi on Crime against Women : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 31 ऑगस्ट रोजो दिल्लीतल्या भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित केलं. यावेळी मोदी यांनी देशभरातील महिलांविरोधातील अपराधांच्या प्रकरणांवर भाष्य केलं. अशा खटल्यांमध्ये पीडित महिलांना त्वरित न्याय मिळायला हवं, असं स्पष्ट मत मोदी यांनी मांडलं. महिलांविरोधातील अपराधांमध्ये जलदगतीने न्याय मिळायला हवा, असं म्हणत मोदी यांनी महिला सुरक्षेवरही त्यांचं मत मांडलं. ते म्हणाले, “महिलांविरोधात कुठेही एखादा अपराध झाला तर त्या प्रकरणांमध्ये महिलांना त्वरित न्याय मिळाला तर महिला सुरक्षेबाबत त्यांच्यातला आत्मविश्वास वाढेल. संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी न्यायपालिकेवर आहे. सर्वोच्च न्यायालय व भारतीय न्यायव्यवस्थेने आजवर ही जबाबदारी चोख पार पाडली आहे”.
या कार्यक्रमाला भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, ज्येष्ठ विधीज्ञ कबिल सिब्बल देखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरन्यायाधीशांसमोर म्हणाले की, ‘भारतातील नागरिकांनी आजवर सर्वोच्च न्यायालयाप्रती कधीही अविश्वास दाखवलेला नाही”. पंतप्रधान मोदी आणीबाणीच्या काळातील परिस्थितीचा ‘काळाकुट्ट काळ’ असा उल्लेख करत म्हणाले, “न्यायपालिकेने आपले मूलभूत अधिकार टिकवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे”.
कोलकाता व बदलापूर प्रकरणावर काय म्हणाले?
मोदी यांनी यावेळी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “आपल्या न्यायव्यवस्थेने आजवर राष्ट्रिय हित सर्वोच्च स्थानी ठेवून आपल्या राष्ट्रीय अखंडतेचं संरक्षण केलं आहे”. कोलकाता येथील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचं प्रकरण आणि बदलापूरमधील (ठाणे) शाळेतील चिमुरड्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मोदी म्हणाले, “महिलांवरील अत्याचार व लहान मुलांची सुरक्षा हा आपल्या समाजासाठी गंभीर विषय आहे”.
…तर महिलांना त्वरित न्याय मिळेल : मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले, महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये पीडितांना जितक्या लवकर न्याय मिळेल तितका त्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास दृढ होईल. देशातील अर्ध्या लोकसंख्येला म्हणजेच महिला वर्गाला देशात सुरक्षित वाटेल. महिलांवरील अत्याचार व इतर गुन्ह्यांशी लढण्यासाठी आपल्या देशात कठोर कायदे आहेत. मात्र त्वरित न्याय मिळावा यासाठी फौजदारी न्याय व्यवस्थेत अधिक चांगला समन्वय राखण्याची आवश्यकता आहे.
कोलकाता येथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयात डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचं प्रकरण दोन आठवड्यांपूर्वी समोर आलं होतं. याप्रकरणी आधी कोलकाता पोलिसांनी तपास केला. मात्र, आता हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे सोपवण्यात आलं आहे. दरम्यान, या प्रकरणावरून व आतापर्यंत झालेल्या तपासावरून कोलकात्यासह देशभरातील राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपा व तृणमूल काँग्रेस हे पक्ष या घटनेवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.