बेंगळूरू : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज इस्रोच्या वैज्ञानिकांची भेट घेतली. ‘चांद्रयान-3’ मोहीम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल त्यांनी वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं. 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करुन भारताने मोठा विक्रम केला होता.
ज्या दिवशी ही मोहीम पार पडली, तेव्हा पंतप्रधान मोदी ब्रिक्स समिटसाठी दक्षिण आफ्रिकेत होते. त्यांनी थेट प्रक्षेपणाद्वारे हा ऐतिहासिक क्षण पाहिला होता. यावेळी त्यांनी आपण भारतात आल्यावर पहिल्यांदा इस्रोच्या वैज्ञानिकांची भेट घेणार असल्याचं मोदींनी घोषित केलं होतं. आपलं वचन पाळून, आज सकाळी ते ग्रीसवरुन थेट बंगळुरूमध्ये दाखल झाले. याठिकाणी असलेल्या इस्रोच्या मुख्यालयात जाऊन त्यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं. यावेळी बोलताना PM मोदी अतिशय भावूक देखील झाले होते.
शिवशक्ती अन् तिरंगा पॉइंट :
यावेळी बोलताना त्यांनी एक मोठी घोषणा केली, की चांद्रयान-3 चंद्रावर ज्याठिकाणी लँड झालं, त्या ठिकाणाला आता ‘शिवशक्ती पॉइंट’ असं नाव दिलं जाणार आहे. यासोबतच, चांद्रयान-2 मधील लँडर ज्याठिकाणी क्रॅश झालं, त्या ठिकाणाला ‘तिरंगा’ म्हटलं जाणार आहे.
नॅशनल स्पेस डे:
भारताने चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे पार पाडून इतिहास रचला आहे. ही ऐतिहासिक कामगिरी 23 ऑगस्ट रोजी पार पडली. त्यामुळे 23 ऑगस्ट या दिवसाला ‘नॅशनल स्पेस डे’, म्हणजेच राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरं केलं जाईल अशी घोषणाही पंतप्रधान मोदींनी यावेळी बोलताना केली.