पीएमओ मोदींनी दाखवला 3 नव्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दि.31 व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तीन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यावेळी बोलत असताना ते म्हणाले, ” वंदे भारत गाड्यांचा विस्तार हा आधुनिकता आणि गतीसह विकसित भारताच्या ध्येयाकडे आपल्या देशाची प्रगती दर्शवितो.
Vande Bharat Train या तिन्ही ट्रेन मेरठ – लखनौ, मदुराई – बेंगळुरू आणि चेन्नई – नागरकोइल दरम्यान धावतील.
दक्षिणेकडील राज्यांचा जलद विकास महत्त्वाचा
पुढे बोलताना ते म्हणाले, “चेन्नई-नागरकोइल मार्गावर, विद्यार्थी, शेतकरी आणि आयटी व्यावसायिकांना खूप फायदा होईल. जिथे जिथे वंदे भारतची सुविधा पोहोचली आहे तिथे पर्यटकांची संख्या वाढली आहे, याचा अर्थ व्यवसाय आणि दुकानदारांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होत आहेत, विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दक्षिणेकडील राज्यांचा जलद विकास महत्त्वाचा आहे.”
दक्षिणेतील रेल्वे वाहतूक मजबूत केली आहे
पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, ” दक्षिण भारतात अफाट प्रतिभा आणि संसाधने आहेत. त्यामुळे, तामिळनाडू, कर्नाटक आणि संपूर्ण दक्षिणेचा विकास आमच्या सरकारसाठी प्राधान्य आहे. गेल्या 10 वर्षांतील या राज्यांमधील रेल्वे विकासाचा प्रवास याचा पुरावा आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात, आम्ही तामिळनाडूच्या रेल्वे अर्थसंकल्पासाठी 6000 कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद केली आहे. हा अर्थसंकल्प 2014 च्या तुलनेत सात पटीने जास्त आहे. तामिळनाडूमध्ये सहा वंदे भारत गाड्या सुरू आहेत आणि आज ही संख्या आठपर्यंत पोहोचेल. असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. आज वंदे भारत गाड्यांच्या आठ जोड्या संपूर्ण कर्नाटकला जोडत आहेत. आम्ही दक्षिणेतील रेल्वे वाहतूक मजबूत केली आहे. या राज्यांमधील रेल्वे मार्ग सुधारले जात आहेत, आणि विद्युतीकरणही होत आहे. ज्यामुळे लोकांच्या राहणीमानात वाढ झाली आहे.
गाड्यांचे मार्ग आणि वेळ जाणून घ्या
मेरठ शहर – लखनऊ वंदे भारत प्रवाशांना दोन शहरांमधील सध्याच्या वेगवान ट्रेनच्या तुलनेत सुमारे एक तास वेळेत बचत होईल. त्याचप्रमाणे, चेन्नई एग्मोर – नागरकोइल वंदे भारत आणि मदुराई – बेंगळुरू वंदे भारत या गाड्या अनुक्रमे 2 तास आणि सुमारे 1 तास 30 मिनिटांपेक्षा जास्त बचत करतील.