मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जसं गुजरातवर प्रेम आहे. तसं तुमचं महाराष्ट्रावर असलं पाहिजे. गुजरातमध्ये अनेक गोष्टी आल्या पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटतं. ते वाटणं चुकीचं नाही.
स्वाभाविक आहे. मोदींचं जसं गुजरातवर प्रेम आहे, तसाच तुमच्या मनातूनही महाराष्ट्र जाता कामा नये, असा कानमंत्र मनसे नेते राज ठाकरे यांनी यूपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिला. यूपीएससीत यश मिळवलेल्या तरुणांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज यांनी या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. त्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला.
आजकाल नेते अधिकाऱ्यांना काहीही बोलत असतात. राजकारणी बदलत असतात. अधिकारी कायम असतात. राज्यात मुख्यमंत्री येत जात असतात तुम्ही तुमची बलस्थाने ओळखा. एक आयएएस अधिकारी मंत्रालयाबाहेर उभा राहुन मुख्यमंत्र्यांना जोरजोरात शिव्या देत असतो. त्यावेळी इतर लोकांनी विचारलं तुला भीती वाटतं नाही का? तर त्यावर त्याने उत्तर दिलं मुख्यमंत्री टेंपरेरी असतो मी पर्मनंट आहे, असा किस्सा राज ठाकरे यांनी सांगितला. त्यावेळी एकच हशा पिकला.
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना बीएमडब्ल्यू कंपनी महाराष्ट्रात आपला प्रकल्प व्हावा यासाठी आली होती. त्यावेळी विलासराव देशमुख यांना काही कारणास्तव मीटिंगसाठी उपस्थित राहणे शक्य नव्हतं. त्यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी बैठकीसाठी पाठवले. तो अधिकारी साऊथ इंडियन होता. त्याने सुरुवातीपासूनच कंपनीच्या अधिकाऱ्यांसमोर नन्नाचा पाढा लावला आणि प्रकल्प महाराष्ट्रात होऊ दिला नाही.
कंपनी नाराज झाल्यानंतर त्याने तात्काळ आपल्या राज्यातील मित्राला फोन करून संबंधित कंपनीशी संपर्क साधण्यास सांगितले आणि संबंधित प्रकल्प तामिळनाडूमध्ये गेल्याचा पाहायला मिळालं. अधिकारी म्हणून कुठेही काम करा. परंतु आपल्या राज्याबाबत प्रेम असू द्या, असंही त्यांनी सांगितलं.