लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायोगाने एक फळ पाठवलं. त्यावरुन आता राजकारण रंगलं आहे. लगेच भाजपाने हा मुद्दा पकडून काही आरोप केलेत. पाकिस्तानी उच्चायोगाने राहुल गांधींना पेटीभरून आंबे पाठवले आहेत. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये हा दावा करण्यात आला आहे. भाजपाने सुद्धा हा मुद्दा उपस्थित करुन राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. “राहुल गांधी पाकिस्तानकडून आंबे मिळाले असून शेजारी देशासोबत त्यांचे नापाक संबंध आहेत” असा आरोप भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केला. राहुल गांधींशिवाय राज्यसभा खासदार कपिल सिब्बल, तिरुवनंतपुरमचे खासदार, काँग्रेस नेते शशि थरूर, समाजवादी पार्टीचे रामपुरचे खासदार मोहिबुल्लाह नदवी, संभलचे खासदार जिया-उर-रहमान बर्क, कैरानाचे खासदार इकरा हसन आणि गाजीपुरचे खासदार अफजाल अंसारी यांना सुद्धा पाकिस्तानने गिफ्टमध्ये आंबे पाठवले आहेत. या संबंधी कुठलही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही.
“काही दिवसांपूर्वी राहुल गांधी म्हणाले होते की, यूपीचे आंबे त्यांना आवडत नाहीत. पाकिस्तानी दूतावासाने त्यांना आंबे पाठवले आहेत. पाकिस्तानी आंब्यासोबत त्यांना अजून काय-काय चांगलं लागतं ते त्यांनी सांगितलं पाहिजे. मोदींना हटवण्याची नवीन आयडीया मागण्यासाठी ते पाकिस्तानकडे गेले आहेत का? पाकिस्तानसोबत त्यांचे नापाक संबंध आहेत” असा आरोप गिरिराज सिहं यांनी ANI शी बोलताना केला.
भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी सुद्धा या मुद्यावरुन विरोधी पक्षांवर टीका केली. “जिथे त्यांचं मन रमतं, तिथून त्यांना आंबे मिळतायत. राहुल गांधी यांना यूपीचे आंबे आवडत नाहीत. पण पाकिस्तानी आंब्यांबद्दल ते उत्साहीत आहेत” असं अनुराग ठाकूर म्हणाले. भाजपा नेते अमित मालवीय यांनी राहुल गांधी, कपिल सिब्बल आणि शशि थरूर सह सात विरोधी पक्ष नेत्यांची लिस्ट जारी केली, ज्यांना आंब्याच्या पेट्या मिळाल्या. “आंबे तुम्हाला कोण पाठवतो, यावरुन सुद्धा काही लोकांची ओळख पटवता येते” असं मालवीय म्हणाले.